गणेशोत्सवात विघ्नकर्त्यांना पोलिसांचा जबर फटका

21 जणांना बाहेर धाडले, 3 तुरुंगात!

-जिल्ह्यात शांती राखण्यासाठी कठोर निर्णय
-जम्बो बंदोबस्ताने सज्ज पोलिस दल
अमरावती / 26 ऑगस्ट : जिल्ह्यातील आगामी 10 दिवसांच्या गणेशोत्सवात शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. गणेशोत्सवात कुठलेही विघ्न निर्माण होऊ नये यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी कडक बंदोबस्त व नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांनी प्राप्त अहवालानुसार, 41 आरोपींवर तडीपारीचा प्रस्ताव तयार केला असून, त्यापैकी 21 आरोपींना जिल्ह्यातून बाहेर धाडण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्यात लिप्त राहणार्‍या 3 आरोपींना एका वर्षासाठी तुरुंगात पाठवले असून, 1 आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील 2504 समाजविघातक व असामाजिक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी केली जात आहे.
गणेशोत्सवात शांती राखण्यासाठी जिल्ह्यात ‘जम्बो’ पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. यामध्ये 1 अपर पोलिस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलिस अधिकारी, 24 निरीक्षक, 55 सहायक निरीक्षक, 97 पोलिस उपनिरीक्षक आणि 2254 पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. अचलपुर, मोर्शी, कुर्हा, खोलापुर, शिरजगाव कसबा यांसारख्या संवेदनशील ठिकाणी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. ग्रामीण भागात बाहेरून आणलेले 2 उपविभागीय अधिकारी, 2 निरीक्षक, 10 उपनिरीक्षक, 25 कर्मचारी, 1 एसआरपीएफ कंपनी आणि 800 होमगार्डही तैनात आहेत.
ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व नागरिकांना शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी गणेशोत्सव व अन्य सण उत्साहाने पण शांतपणे साजरे करण्याची विनंती केली आहे.
-उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई
गणेशोत्सवासोबतच 6 सप्टेंबरच्या गणेश विसर्जन आणि 5 सप्टेंबरच्या ईद-ए-मिलाद पर्वात शांती राखण्यासाठी 26 ऑगस्ट रात्री 12 वाजता ते 9 सप्टेंबर रात्री 12 वाजता प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. या आदेशानुसार सार्वजनिक कार्यक्रम, शोभायात्रा, जुलूस, झांक्यांमध्ये अपत्तिजनक घोषणाबाजी, फलक लावणे, डॉल्बी साऊंड सिस्टमचा गैरवापर, शस्त्र किंवा ज्वलनशील पदार्थ ठेवणे, गर्दी करणे, मारपीट करणे, जातीय व धार्मिक सौहार्द भंग करणे, सोशल मीडियावर अपप्रचार करणे यावर सक्त प्रतिबंध आहे. उल्लंघन झाल्यास भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 व इतर प्रचलित कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.

संबंधित बातम्या

Back to top button