पिकअप बोलेरोची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

शिरखेड फाट्याजवळी घटना

मोर्शी /17 ऑक्टोबर : भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप बोलेरो गाडीने मोटरसायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दि. 16 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास शिरखेड फाट्यानजीक घडली. अपघातानंतर बोलेरो गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव तुळशीदास फंदे (वय 63 वर्षे, रा. गुजरी बाजार, मोर्शी) असे असून ते मोर्शी येथील फंदे ज्वेलर्सचे संचालक होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळशीदास फंदे हे काही कामानिमित्त अमरावती येथे गेले होते. अमरावतीवरून आपल्या मोटरसायकल (क्र. एमएच 27 बीडब्ल्यू 0647) ने मोर्शीकडे परत येत असताना, शिरखेड फाटा ते पहलवान बाबा मंदिर या दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडी (क्र. एमएच 30 एबी 4598) च्या चालकाने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवत मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत तुळशीदास फंदे यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर त्यांना तात्काळ अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे नेण्यात आले. तेथे हजारो नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह सेवागारात ठेवण्यात आला. आज दि. 17 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. स्थानिक हरे राम हरे कृष्ण स्मशानभूमी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडले. तुळशीदास फंदे हे माजी नगराध्यक्ष कैलास फंदे यांचे मोठे भाऊ होते. या प्रकरणी शिरखेड पोलिसांनी बोलेरो गाडीच्या चालकावर गुन्हा नोंद करून घटनास्थळावरून गाडीसह फरार झालेल्या चालकाचा शोध सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button