तोतया पोलिसांनी दोघांना घातला लाखोंचा गंडा

मोर्शी व तिवस्यातील घटना

-एकाला धमकावून दुसर्‍याला चलाखीने लुटले
मोर्शी / 18 जून: क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करुन रस्त्याने जात असलेल्या दोघांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना जिल्ह्यात घडल्या. तिवसा आणि मोर्शी येथील या घटना आहे. मोर्शीत हातचलाखीने तर तिवस्यात धमकावून लाखो रुपयांचे सोन्याचे दागीणे या तोतया पोलिसांनी लुटून नेले. या घटनांमुळे पोलिस वर्तुळातही खळबळ उडाली असून स्थानिक पोलिसांसोबतच ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरु केला आहे.
मोर्शी येथे आज बुधवारी (दि. 18) सकाळी 10.30 ते 11 वाजताच्या सुमारास महादेव कॉलनी जवळ घडली ही घटना घडली. याबाबत श्यामसुंदर राधाकिसन बंग यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार श्यामसुंदर बंग हे गावातील आपले काम आटोपून सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरी परतत होते. त्यांच्या घरासमोरच मोटरसायकल वरून आलेल्या दोन चोरट्यांनी आपण क्राईम ब्रँचचे पोलीस असून शहरामध्ये चोर्‍यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे तुमचे कडील सोने हे सुरक्षित ठेवा, तुम्ही अंगावर सोने घालून फिरू नका, ते काढा व खिशात ठेवा अशी बतावणी केली. अंगावरील सोने व्यवस्थित बांधून देतो असे सांगून त्यांनी बंग यांच्या गळ्यातील 22 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी किंमत अंदाजे 1लाख 73 हजार रुपये व अंगठी 5 ग्रॅम किंमत 32 हजार त्यांच्याजवळून घेतले आणि नंतर कागदात बांधून त्यांना हे दागीणे परत केल्याचे दर्शविले. काही वेळानंतर बंग यांनी ती पुडी उघडून बघितली असता त्यामध्ये तीन लहान दगड आढळून आले. दोन चोरट्यानी हातचलाखीने बंग यांचे अंदाजे दोन लाखाचे दागिने चोरून नेले.
याप्रकरणी मोर्शी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून पुढील तपासणी मोर्शी पोलीस करीत आहे. शहरातील प्रतिष्ठित नागरिक रामदास कापसे नामक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकालाही दोन व्यक्तींनी क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याची बतावणी करुन गंडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र रामदास कापसे यांनी त्यांना आय कार्ड विचारले असता त्यांनी तेथून काढता पाय घेतला, अशी माहितीही मिळाली आहे.
बनवेगिरीची दुसरी घटना तिवसा तालुक्यात मोझरी शेंदोळा येथे बायपास मार्गावरील पेट्रोल पंपानजीक घडली. याबाबत तिवसा येथील रहिवासी असलेल्या अजय पांडे या युवकाने तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अजय पांडे हे मंगळवारी, रात्री उशिरा मोझरी शेंदोळा बायपास मार्गे तिवस्याला घरी परतत असताना आशिर्वाद बारनजीक तिन भामट्यांना त्यांना थांबविले. आपण गुन्हे शाखेचे पोलिस असल्याची बतावणी त्यांनी केली. धाक दपटशा करुन त्यांनी अजय पांडे यांच्याकडील सोन्याचे दागीणे आणि रोख जबरदस्तीने हिसकावून तेथून पळ काढला. दोन्ही प्रकरणांचा जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button