‘एरिया 91’ च्या संचालकाला एक दिवसाची पोलिस कोठडी

आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हे वाढविले

-फेक वेडिंग पार्टीचे प्रकरण
-अल्पवयीनांनाही पाजली होती दारु
अमरावती / 18 जुलै : फेक वेडिंग पार्टीच्या नावाखाली इवेंट आयोजित करुन त्यात युवक-युवतींना मद्य उपलब्ध करुन दिल्याचे खळबळजनक प्रकरण 13 जुलै रोजी शंकर नगरातील एरिया 91 रेस्ट्रो बार या हॉटेलमध्ये उघडकीस आले होते. तब्बल 70 ते 80 युवक-युवतींना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणात या हॉटेलचा संचालक आनंद राजू भेले (33, रा. समर्थ हायस्कुलसमोर, देवरणकर नगर, अमरावती) याला पोलिसांनी अटक केली असून त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
13 जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान या पार्टीत 4 अल्पवयीन तरुण मद्यधुंद अवस्थेत आढळून आले होते. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी असलेल्या पार्टीच्या आयोजकांवर आता पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे वाढविण्यात आले आहे. शंकर नगर येथील आनंद भेले याच्या मालकीच्या ‘एरिया-91 रेस्ट्रो बार’ या हॉटेलमध्ये सैम हेमंत बजाज (19, रा. अनूप नगर) आणि त्याच्या अन्य चार अल्पवयीन साथीदारांनी ही फेक वेडिंग पार्टी आयोजित केली होती. या ईव्हेंटला शहरातील शंभरपेक्षा अधिक तरुण-तरुणी उपस्थित होते. त्यांना आयोजकांनी दारुही उपलब्ध करुन दिली होती.
यावेळी पार्टीच्या नावाखाली मद्य प्राशन करुन धिंगाणा घातला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-2 चे निरिक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलिस ताफा या हॉटेलमध्ये पोहोचला. छाप्यादरम्यान अनेक तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. 70 ते 80 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. याप्रकरणात राजापेठ पोलिस ठाण्यात ‘एरिया 91’ चा संचालक आनंद भेले व आयोजक सैम हेमंत बजाज यांच्यासह चार अल्पवयीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वैद्यकिय तपासणीत चार अल्पवयीन बालकांनीही या पार्टीदरम्यान मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पार्टीत अल्पवयीनांना मद्याचे वितरण करणे, त्यांना मद्यप्राशन करण्यास प्रोत्साहन देणे या कारणावरुन आरोपींवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याची कलमे वाढविण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी याबाबत राजापेठ पोलिसांना निर्देश दिले होते. हॉटलचा मालक आनंद भेले याला अटक करुन न्यायालयासमक्ष सादर करण्यात आले. त्याला पोलिसांच्या विनंतीवरुन एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button