आनंद काळे यांचे संचालकत्व रद्द करण्याची नोटीस

जिल्हा बँकेतील वाद कायम, 29 जुलैला सुनावणी

अमरावती / 27 जुलै : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एडीसीसी) वाद अजूनही शमलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमधील मतभेदांमुळे बँक नेहमीच चर्चेत राहते. याच वादातून आनंद काळे यांना त्यांचे संचालकत्व का रद्द करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसची सुनावणी 29 जुलैला होणार आहे.
विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या कार्यालयाने ही नोटीस बजावली होती. त्यात 14 जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले होते. परंतु काळे यांनी नोटीस मिळालीच नाही असा युक्तिवाद करत स्पष्टीकरण सादर केले नव्हते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 क (अ) नुसार संचालक पदावरून निष्कासित का करू नये, अशी विचारणा त्यांना करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या बारा संचालकांनी 21 एप्रिल 2025 रोजी काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की काळे पदावर आरूढ झाल्यापासून बँकेच्या हिताविरुद्ध मनमर्जीने काम करत आहेत. नियमांशी तडजोड करून ते अपहार करत असल्याचेही नमूद केले आहे. कलम 78 अ नुसार त्यांनी केलेल्या खर्चाचा बोध होत नसल्याने त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी आहे. न्यायालयात दाखल केलेल्या एका प्रकरणी नेमण्यात आलेल्या वकिलाची फी बँकेच्या खात्यातून नियमबाह्य देण्यात आली, असाही आरोप त्यांच्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर विभागीय सहनिबंधक यांनी काळे यांना नोटीस बजावली आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादात विद्यमान अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावरही पद गमावण्याची वेळ आली होती. सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगनादेश दिल्यामुळे ते या पदावर कायम आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे जवळचे सहकारी आनंद काळे यांनाही संचालक पदावरून दूर करण्याची नोटीस जारी झाल्याने सहकार क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button