नीरज को-ऑप. बँकेकडून दर्यापूरकरांची लाखो रुपयांनी फसवणूक
फिक्स डिपॉझिटची रक्कम हडपली

-पैसे देण्यास टाळाटाळ, बँकेला टाळे
-आकर्षक योजनांचे आमिष दाखवून गंडविले
दर्यापूर / 4 जुलै: मुदती ठेवीवर जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लोकांकडून जमा केलेली लाखो रुपयांची रक्कम नीरज मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह नामक बँकेने हडपल्याचा प्रकार दर्यापूर येथे घडला आहे. बँकेच्या शाखेला टाळे लागले असून व्यवस्थापकाशी संपर्क केला असता त्याच्याकडून ग्राहकांना पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संबंधितांवर कारवाई करुन पैसे परत मिळवून देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
दर्यापूर येथे तीन ते चार वर्षांपासून निरज मल्टीपर्पज निधी बँकेची शाखा कार्यरत होती. बँकेच्या स्थानिक अधिकारी आणि कर्मचार्यांनी लोकांना मुदती ठेववर जास्त व्याजदरासोबतच अन्य आकर्षक योजनांचे आमिष दाखविले. त्याला भाळून अनेक लोकांनी लाखो रुपयांच्या ठेवी या बँकेत जमा केल्या. बँक अधिकारी आणि कर्मचार्यांनी ओळखीचा गैरफायदा घेउन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. एका व्यक्तीने शेतातून मिळालेल्या रकमेपैकी 5 लाख रुपये एका प्रतिष्ठित बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले होते. निरज बँकेच्या व्यवस्थापकाने ओळखीचा फायदा घेउन या व्यक्तीला 5 लाख रुपयांवर दरवर्षी 55 हजार रुपये व्याज देण्याची बतावणी करुन ही रक्कम निरज बँकेत वळती करण्यास भाग पाडले.
आता एक महिन्यापासून ही व्यक्ती आपली रक्कम परत मिळावी म्हणून व्यवस्थापक व बँकेतील अधिकार्यांकडे तगादा लावत आहे, मात्र त्यांच्याकडून पैसे देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. या व्यक्तीसोबत घडलेल्या प्रकारानंतर अन्य ग्राहकांनीही बँकेकडे पैसे परत मागितले असता त्यांनाही असाच अनूभव आला. एवढेच नाही तर बँकेने जागेचे भाडेही थकविले असून बँक शाखेला टाळे लावण्यात आले आहे. व्यवस्थापक वगळता अन्य कोण्याही जबाबदार अधिकार्यांशी आता ग्राहकांचा संपर्क नाही. व्यवस्थापक केवळ पैसे परत मिळतील, एवढे सांगून टाळाटाळ करण्याचे काम करित आहे.
एकुण प्रकार पाहता निरज को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. गंभीर बाब अशी की, या बँकेत काम करणार्या एका कर्मचार्याचेच सव्वा लाख रुपये बँकेत अडकले आहे. या कर्मचार्यानेच स्वत: ही माहिती दिली आहे. बँकेने तालुक्यातील काही लोकांना कर्ज स्वरुपात रक्कम वाटली असल्याची माहितीही पुढे आली आहे. असे लोक याबाबतीत मूग गिळून गप्प आहेत. ज्या ग्राहकांची या निरज बँकेने फसवणूक केली त्यात अनेक लोक अत्यंत गरीब असल्याचे समजते. या प्रकारामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
मागच्या वर्षी दर्यापुरात ढोकेश्वर नामक अशाच एका बँकेने असंख्य लोकांची लक्षावधी रुपयांनी फसवणूक केली होती. आता शहरात पून्हा असा प्रकार घडल्याने संबंधितांकडून संताप व्यक्त केला जात आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी पोलिसांत तक्रार करण्याची तयारी चालविली आहे. दर्यापूरातील नागरिकांचे कष्टाचे पैसे हडपणार्या बँकेच्या मुख्य सूत्रधाराला शोधून काढावे आणि आमची रक्कम परत मिळावी याकरिता तातडीने आवश्यक ती पावले उचलली जावी, अशी मागणी संबंधितांकडून करण्यात येत आहे.




