मनपाने 125 अनधिकृत दुकाने हटविली
ट्रान्सपोर्ट नगरात अतिक्रमण विभागाची कारवाई

अमरावती /6 नोव्हेंबर : अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आज ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अनधिकृत बांधकामे, टिनशेड दुकाने आणि खोके यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
ट्रान्सपोर्ट नगर हा परिसर दीर्घकाळापासून विविध व्यापार्यांनी व्यापलेला असून, येथे साधारणतः 300 दुकाने असल्याची माहिती आहे. त्यापैकी अनेक दुकाने व टिनशेड रचना परवानगीशिवाय उभारण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात आज सुमारे 125 अनधिकृत दुकाने आणि टिनशेड पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान अनधिकृत खोके व शेड हटविण्यात आले असून, ही कारवाई पुढील काही दिवस सतत सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कारवाईसाठी अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे पथके तयार केली होती. संपूर्ण कारवाईदरम्यान तीन जेसीपी मशीन आणि तीन मोठे ट्रक सतत कामावर तैनात होते. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवत कारवाईदरम्यान कोणताही अनुशासनभंग होऊ नये याची काळजी घेतली. महानगरपालिकेचे अधिकार्यांनी सांगितले की, शहरातील सार्वजनिक रस्ते, फूटपाथ आणि वाहतूक मार्ग व्यापणार्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, तसेच स्वच्छतेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला असून, ही मोहीम टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व भागांमध्ये राबविण्यात येईल. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अनधिकृत बांधकामे करू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शहर स्वच्छ, सुबक आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील उर्वरित 175 अनधिकृत दुकाने देखील हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नागरिक व व्यापार्यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे दूर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




