भर रस्त्यात कचर्यांचे पहाड, बडनेरात स्वच्छतेचा बोजवारा
वरुडा परिसरात संतप्त रहिवासी रस्त्यावर

-मनपा आयुक्तांचा कडक आदेश हवेतच
-कंत्राटदारांची बेफिकिरी वाढली
बडनेरा / 17 सप्टेंबर : बडनेरा नवीवस्तीत वरूडा परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ जमा करण्यात आलेल्या प्रचंड कचर्याच्या ढिगामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. दुर्गंध, रोगराईचा धोका, जनावरांची गर्दी यामुळे दैनंदिन जीवनच विस्कळीत झाले आहे. नेहमीप्रमाणे कंत्राटदार व स्वच्छता कर्मचारी यांच्याविरोधात नागरिकांनी आवाज उठवला तरीही समस्या न सुटल्याने अखेर ते रस्त्यावर उतरले. हा संताप प्रशासनासाठी फक्त स्थानिक पातळीवरील आंदोलन नाही तर दुर्लक्षित होत जाणार्या नागरी समस्यांचा घोषक हल्ला ठरला आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या काटेकोर सूचना आणि स्थानिक जनतेच्या तक्रारी हे सर्व असूनही बडनेरा नवीवस्ती प्रभाग 22 मध्ये कचर्याचे ढिगारे उभे राहाणे हा प्रसंग केवळ अस्वच्छतेचा मुद्दा राहिलेला नाही. हा प्रकार महानगरपालिकेच्या कंत्राटी व्यवस्थेतील त्रुटी आणि देखरेखीतील शिथिलपणा चव्हाट्यावर आणणारा ठरत आहे. महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेचा पाया हा कंत्राटी यंत्रणांवर उभा आहे. कचरा उचलणे, त्याची विल्हेवाट लावणे यासाठी ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. मात्र वास्तवात कचरा उचलण्याऐवजी तोच प्रमुख रस्त्यांवर साठवून ठेवला जातो. शहरातील सर्व ढिगारा गोळा करून वरुडा मार्गावरच डंप करणे आणि अनेक दिवस तेथेच साचून ठेवणे हा प्रकार फक्त निष्काळजीपणा नाही तर नागरी हक्कांचे उल्लंघन असल्याची तीव्र भावना शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
-आदेश व वास्तव यांतील तफावत
मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी काटेकोरपणे स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यावर प्रत्यक्ष अंमल होत नसल्याचे दिसून येत आहे. नियोजनाचा अभाव, कर्मचारी व ठेकेदारांवर नियंत्रण नसणे आणि जवाबदारी निश्चित न होणे हे मूलभूत दोष या उदाहरणातून स्पष्ट दिसतात.
-उपाययोजना कोण करणार?
हा प्रश्न केवळ एका प्रभागाचा नसून शहर नियोजनाच्या एकंदर गुणवत्तेचा आहे. शाश्वत कचरा व्यवस्थापनाचे धोरण, कंत्राटदारांवरील ताबा व दंडात्मक कारवाई आणि पारदर्शक देखरेख यांशिवाय हे चित्र बदलणार नाही. याच समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीच्या उपाययोजना न झाल्यास कचरा हा केवळ दुर्गंधीचा प्रश्न न राहता महापालिकेविरोधातील राजकीय असंतोषाचा विषय बनू शकतो.




