धारणीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर अमरावतीत बलात्कार
मायानगरातील घटना, गुन्हा दाखल

-पिडितेची पोलिस ठाण्यातच प्रकृती बिघडली
अमरावती / 8 जुलै: शिक्षणानिमित्त अमरावती शहरातील मायानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर एका नराधमाने बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी परिसरात असलेल्या माया नगरात सोमवारी, रात्री ही घटना घडली. मयुर संतोष कराळे असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान याबाबत तक्रार देण्यासाठी राजापेठ पोलिस ठाण्यात आलेल्या पिडितेची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
धारणी येथील मुळ रहिवासी असलेली पिडित 17 वर्षीय युवती अमरावतीत वास्तव्यास आहे. माया नगर येथे ती आपल्या भाउ व मोठ्या बहिणीसह भाड्याच्या घरात राहते. आरोपी मयुर कराळे हा तिच्या घराशेजारीच एका खोलीत भाड्याने राहतो. सोमवारी सायंकाळी पिडितेची बहिण आणि भाउ कामानिमित्त बाहेर गेले होते. घरासमोर पायर्यांवर बसून ती त्यांची वाट पाहत होती. तेव्हा मयुर कराळे हा बाथरुममधून बाहेर आला. त्याने अचानक या विद्यार्थीनीला जबरदस्तीने ओढत आपल्या खोलीत नेले आणि बळजबरी करायला सुरुवात केली.
यावेळी पिडितेने मयुरचा जोरदार प्रतिकार करुन त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मयुरने तिला मारहाण केली आणि नखांनी तिच्या हात, पाय आणि गळ्यावर ओरबाडले. त्याने जबरदस्तीने या विद्यार्थीनीसोबत दुष्कृत्य केले. त्यानंतर मयुर घटनास्थळाहून पसार झाला. काही वेळाने तिचा भाउ घरी परतला तेव्हा तिने त्याला आपबिती सांगितली. मोठी बहिण रात्री दहा वाजता नोकरीवरुन परतल्यानंतर तिघे भाउ-बहिण राजापेठ पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पिडितेने तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे हादरलेल्या या अल्पवयीन युवतीची राजापेठ पोलिस ठाण्यातच प्रकृती खालावली. त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मयुर कराळे याच्यावर बाल लैंगिक कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.




