प्रवासी महिलेची सव्वा लाखांची रोकड लंपास
बसमध्ये चढताना मारला डल्ला

-मोझरी बसस्थानकावरील घटना
अमरावती / 9 जुलै: एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा गैरफायदा घेउन अज्ञात चोरट्याने एका 74 वर्षीय वृद्ध महिलेच्या पर्समधील सव्वा लाख रुपयांची रोकड व 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, असा 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी, सायंकाळी उशिरा गुरुकुंज मोझरी बसस्थानकावर घडली.
विमल बाबूराव सोनकुसरे या वृद्ध महिलेने यासंदर्भात तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विमल सानकुसरे या मुळच्या मोझरीच्या रहिवासी असून आता त्या नागपूर येथे स्थायिक झाल्या आहेत. त्यांची पेंशन मोझरी येथील बँकेतच जमा होते. मंगळवारी पेंशन काढण्यासाठी त्या मोझरीला आल्या होत्या. काही महिन्यांचे पेंशनचे एकत्रित 1 लाख 25 हजार रुपये त्यांनी बँकेतून काढले. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूर येथे जाण्यासाठी विमल सोनकुसरे मोझरी बस स्थानकावर आल्या. त्यांनी सदर रक्कम आपल्या पर्समध्ये ठेवली होती.
नागपूरला जाणार्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा गैरफायदा घेउन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन उघडून त्यातील रोकड व मोबाईल तसेच बँक पासबून व अन्य काही वस्तू लंपास केल्या. बसमध्ये चढल्यानंतर सोनकुसरे यांच्या घडलेला प्रकार लक्षात आला. त्या लगेच बसमधून खाली उतरल्या. त्यानंतर त्यांनी तिवसा पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.




