दत्तवाडीतील घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त
पिस्टलसह तलवारी, चाकुंचा समावेश

अमरावती / 23 जुलै : नांदगाव पेठ पोलिसांनी दत्तवाडी परिसरातून एका इसमाच्या घरातून प्राणघातक शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. पिस्टलसह तलवारी, चाकू अशी शस्त्रे पोलिसांनी या घरातून हस्तगत केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरुच होती. घरात आणखी शस्त्र दडवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. दिपेश दीपक काकडे या इसमाच्या घरावर छापा मारुन नांदगाव पेठ पोलिसांनी ही कारवाई केली.
नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या अमरावती शहरातील देशमुख लॉननजीक असलेल्या दत्तवाडी परिसरात नक्षत्र नामक इमारत आहे. दिपेश काकडे याचे याच इमारतीत घर आहे. दिपेश काकडेच्या घरात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची गोपनिय माहिती नांदगाव पेठ पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन आज बुधवारी, सायंकाळी उशिरा नांदगाव पेठचे पोलिस निरिक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पथकाने काकडे यांच्या घरी धडक देवून छापा मारला.
पोलिसांनी काकडे याच्या घराची झडती घेतली असता अनेक प्राणघातक शस्त्रे पोलिसांनी आढळून आली. त्यात एका पिस्टलसह 5 धारदार तलवारी, सहा चाकू आणि तीन चायना चाकूंचा समावेश आहे. काकडेने घरात आणखी शस्त्रे दडून ठेवल्याचा संशय असल्याने पोलिसांकडून घराची झडती उशिरापर्यंत सुरुच होती. दिपेश काकडेने ही शस्त्रे कोठून आणि कशासाठी आणली. त्याचा वापर तो कोणत्या कामासाठी करणार होता. दिपेश शस्त्रांचा तस्कर व व्यापारी आहे काय, याबाबत नांदगाव पेठ पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.




