आयुक्तांच्या पाहणीनंतर तासाभरात अतिक्रमने जमीनदोस्त
बडनेरात 15 दुकानांवर महापालिकेचा हातोडा

*आठवडी बाजारात 5 दुकांनाना सीलही ठोकले
अमरावती / 1 जुलै: अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहराचा दौरा करुन अनेक बाबतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. त्याअंतर्गत आज सकाळी त्यांनी बडनेरा शहरातील आठवडी बाजारात भेट देवून पाहणी केली. येथे अतिक्रमनामुळे वाहतुकीचा उडालेला बोजवारा आणि उघड्यावर जनावरांची कत्तल करुन सुरु असलेली मांसविक्री, हे चित्र पाहुण आयुक्तांचा पारा चढला. त्यांनी या गैरप्रकारा विरोधात तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर काही तासांतच महापालिकेच्या पथकाने अतिक्रमनातील 15 दुकाने जमीनदोस्त केली आणि नियमांचे उल्लंघन करणार्या आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणार्या 5 दुकांनाना सिल ठोकले. आज मंगळवारी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आपल्या पाहणी दौर्याअंतर्गत बडनेरा नवीवस्तीतील मुख्य व्यापारीपेठ असलेल्या आठवडी बाजार परिसरात भेट दिली. येथे अनेक व्यावसायिकांनी महापालिकेच्या जागेत गैरकायदेशिररीत्या अतिक्रमण करुन आपली दुकाने थाटली असून त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच इतर अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याचठिकाणी एका भागात काही मांस विक्रेत्यांची दुकाने आहेत. त्यांच्याकडून उघड्यावरच जनावरांची कत्तल व मांस विक्री केली जाते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होवून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे गंभीर चित्र पाहुण आयुक्त सौम्या शर्मा यांचा पारा चढला. बडनेरा आठवडी बाजारातील ही अव्यवस्था दूर करुन येथील गैरप्रकार थांबविण्यासाठी लगेच कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौम्या शर्मा यांनी बाजार परवाना विभाग, अतिक्रमण विभाग, पशुसंवर्धन विभाग व संबधीत अधिकार्यांना दिले. सौम्या शर्मा दौरा आटोपून अमरावतीला परतताच काही तासाभरातच महापालिकेचे संयुक्त पथक बडनेरा आठवडी बाजारात दाखल झाले. व्यावसायिकांच्या विरोधाला न जुमानता पोलिस बंदोबस्तात अतिक्रमनातील 15 दुकाने तोडण्यात आली. तसेच नियमबाह्य 5 दुकानांना सिल ठोकण्यात आले. या व्यावसायिकांकडे महानगरपालिका बाजार परवाना विभागाचे कुठलेही परवाने नसल्याचे आढळून आले. तसेच ही दुकाने मनपाच्या जागेवर अतिक्रमन करुन उभारली होती. या दुकानांच्या मालकांवर महानगरपालिका अधिनियम कलम 231, 232, 336 अन्वये कार्यवाही करण्यात आली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त- मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर लगेच महापालिकेचा ताफा कारवाईसाठी आठवडी बाजारात
पोहोचला. त्यामुळे व्यावसायिकां मध्ये खळबळ उडाली. लोकांचा मोठा जमावही गोळा झाला होता. हा भाग काहीसा संवेदनशील समजला जातो. त्यामुळे कारवाई करताना महापालिकेने आधीच बडनेरा पोलिसांना सूचना दिली होती. कारवाईदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. व्यावसायिकांच्या विरोधाला न जुमानता अतिक्रमन हटविण्याची कारवाई जोमाने करण्यात आली. या कार्यवाहीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंन्द्रे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दिपक खडेकार, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, राहुल वैद्य, बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण, अजय बन्सेले आदी सहभागी झाले होते.




