क्रुझरची ऑटोला धडक, 14 जण जखमी
अंजनगाव-दर्यापूर मार्गावर अपघात

-क्रुझरमध्ये होते लग्नाचे वर्हाड
अंजनगाव सुर्जी / 6 जून : लग्नाचे वर्हाड घेउन जात असलेले क्रुझर वाहन आणि प्रवासी ऑटोरिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानंतर क्रुझर वाहन तीन पलट्या खात उलटले आणि भीषण अपघात घडला. त्यात क्रुझरमधील 12 तर ऑटोरिक्षातील चालक व प्रवासी असे एकुण 14 जण जखमी झाले आहे. दर्यापूर – अंजनगाव सुर्जी मार्गावर निंभारी फाट्यावर आज दुपारी हा अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी क्रुझर क्रमांक एमएच 22 / यु 3154 या वाहनातून एका लग्न कार्यासाठी काही वर्हाडी दर्यापूरवरुन अंजनगाव सुर्जीकडे येत होते. निंभारी फाट्यानजीक अचानक एमएच 27 / एएफ 376 क्रमांकाचा प्रवासी ऑटो क्रुझरच्या समोर आला. ऑटोरिक्षाला वाचविण्याचा क्रुझर चालकाने प्रयत्न केला असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. क्रुझरने आधी ऑटोरिक्षाला धडक दिली आणि नंतर रस्त्याच्या कडेला तीन पलटी घेत क्रुझर उलटली.
या अपघातात क्रुझरमधील 12 लोक गंभीर व किरकोळ जखमी झाले. ऑटोचालक व ऑटोतील एक प्रवासी गंभीररीत्या जखमी आहेत. सर्व जखमींना अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहीजणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अमरावती येथे जिल्हा सामान्य आणि अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.