किरिट सोमय्या पून्हा अचलपूर-परतवाड्यात पोहोचले

61 बोगस प्रमाणपत्र प्रकरण

-आठ दिवसांत चौकशीचा अल्टिमेटम
-नगर परिषद, तहसील व पोलीस ठाण्यात बैठक
अचलपूर / 18 सप्टेंबर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अचलपूर-परतवाडा शहराला भेट देत बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत गांभीर्याने चर्चा केली. नगर परिषद ते तहसील आणि पोलीस ठाण्यापर्यंत त्यांनी अधिकार्‍यांशी सलग बैठक घेऊन, आठ दिवसांत चौकशी पूर्ण करून गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनासमोर ठेवली. सोमय्या यांचा दौरा हा बोगस प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणण्यावर केंद्रित राहिला.
दौर्‍याची सुरुवात त्यांनी परतवाडा येथील अचलपूर नगर परिषद कार्यालयातून केली. तेथे मुख्याधिकारी धीरज कुमार यांच्याशी त्यांनी घोटाळ्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अचलपूर तहसील कार्यालात जाऊन तहसीलदार डॉ. संजय गरकळ यांच्यासह सविस्तर चर्चा केली. तहसील बैठकीनंतर सोमय्या थेट अचलपूर पोलीस ठाण्यात गेले. येथे उपविभागीय अधिकारी माधव गरुड आणि ठाणेदार गजानन म्हेत्रे यांच्यासोबत बैठक घेऊन, संबंधित कागदपत्रांचा आढावा घेतला. पत्रकारांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, अचलपूरमध्ये तब्बल 61 बोगस प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत. संबंधित कागदपत्रांनुसार टीसी (ट्रान्सफर सर्टिफिकेट) व आधार कार्डांवरील जन्मतारखांत स्पष्ट विसंगती दिसून येते. हे सरळसरळ फसवणुकीचे स्वरूप असून याची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे.
सोमय्या यांनी तहसील प्रशासन आणि पोलीस खात्याला विद्यमान प्रकरणाची चौकशी करून आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जर दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा देखील त्यांनी दिला. राज्य पातळीवरील तपासाचा उल्लेख करताना सोमय्या म्हणाले की, गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणांचा शोध आम्ही घेत आहोत. आतापर्यंतच राज्यभर 1600 हून अधिक प्रमाणपत्रे बोगस असल्याचे समोर आले असून संबंधितांविरोधात कारवाई सुरू आहे. अचलपूरचे प्रकरण गंभीर असून दोषींना शिक्षा होणारच.
अचलपूर दौर्‍यात सोमय्या यांनी नगर परिषद व तहसील अधिकारी, तसेच पोलीस प्रशासनाशी थेट चर्चा करत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या घोटाळ्याला वाचा फोडली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button