‘कीप सायलेंट, अ‍ॅक्शन व्हायलेंट’, सीपी अरविंद चावरियांचा धडाकेबाज फंडा

अमरावतीत गुन्हेगारीला लगाम

-शहर पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’ सुरू
-गुन्हेगारांवर तुफानी कारवाई
अमरावती / 1 ऑगस्ट : अमरावती शहरात सध्या गुन्हेगारांची अक्षरशः धडकी भरली आहे. कारण, शहराचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी गुन्हेगारीच्या विरोधात ठाम भूमिका घेत ती प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली आहे. ‘कीप सायलेंट, अ‍ॅक्शन व्हायलेंट’ या त्यांच्या कार्यशैलीचा परिणाम म्हणजे अवघ्या काही दिवसांतच शहरात विविध स्वरूपांच्या अवैध कृत्यांविरुद्ध जोरदार कारवाया सुरू झाल्या आहेत.
गेल्या 2-3 दिवसांतच शहर पोलिसांनी चोरलेली 20 हून अधिक दुचाकी वाहने हस्तगत केली असून वाहनचोर टोळ्यांना ताब्यात घेतले आहे. इतकेच नव्हे तर, अवैध दारू विक्री करणारे ढाबे आणि हॉटेल्सवरही धाडी टाकून कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर, मसाजच्या नावाखाली चालणार्‍या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यांवरही स्पा सेंटर्सवर सलग छापे टाकले गेले. या सगळ्या कारवाया एकाच धाग्यातून सुरू आहेत – शहर गुन्हेगारीमुक्त करायचे आहे.
पोलिस आयुक्त चावरिया यांनी पदभार स्वीकारताच अमरावतीत एकही अवैध धंदा सहन केला जाणार नाही, हे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानुसार क्राईम ब्रँच युनिट-1, युनिट-2, नागपुरी गेट पोलिस आणि सीआययू पथकाने एकत्रित मोहीम हाती घेतली. त्यात 15 पेक्षा अधिक ड्रग तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांच्या जवळून 15 लाखांहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई राज्यातील अनेक शहरांसाठी आदर्श ठरणारी आहे.
अवैध दारू विक्रीच्या प्रकरणांत 150 च्या आसपास आरोपींना अटक करण्यात आली. लाखो रुपयांचे माल जप्त करण्यात आले असून, या मोहिमेमुळे शहरातील ढाबे आणि लपवाछपव स्थळांवरील अवैध दारूचे धंदे पुरते उध्वस्त झाले आहेत. शहर पोलिसांनी आतापर्यंतच्या कारवायांमध्ये 4 पिस्तुलं, 100 पेक्षा अधिक तलवारी, चाकू, कोयते यासह मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. जवळपास 70 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील टोळीगिरी व दहशतीसह गुन्हेगारीला मोठा आळा बसला आहे.
अमरावती शहरात आता नाईट पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. अनेक लोक वाईन शॉपमधून दारू घेऊन रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी उभे राहून चकणा, डिस्पोजेबल ग्लास वापरून दारू पितात. अशा प्रकारांवर शहर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात शहराच्या विविध भागांतून तक्रारी मिळाल्या होत्या, ज्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ‘कीप सायलेंट, अ‍ॅक्शन व्हायलेंट’ हे केवळ घोषवाक्य नसून, आता अमरावती पोलिसांची खरी ओळख बनली आहे. सीपी अरविंद चावरिया यांच्या आक्रमक नेतृत्वात अमरावती शहर आता गुन्हेगारीविरुद्ध निर्णायक टप्प्यावर आहे. हे दृश्य फक्त पोलिसांपुरते मर्यादित न राहता, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आश्वासक वाटते.
-सकाळी 9 वाजता थेट हजर
केवळ कारवाई नव्हे, तर शिस्तही. सीपी चावरिया यांनी प्रत्येक थानेदाराला सकाळी 9 वाजता थेट पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. यासह व्हॉट्सअ‍ॅपवर रिपोर्टिंगची व्यवस्था करून पारदर्शकता व तत्परता वाढवण्यात आली आहे. प्रत्येक थानेदार त्याच्या हाताखालच्या पोलीस कर्मचार्‍यांना कामाचे थेट आदेश देत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button