कलागुणांचा सादरीकरणातून नवोदित डॉक्टर विद्यार्थ्यांनी जोपासला निरोगी आरोग्याचा छंद

श्री हव्याप्र मंडळ विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयात शौर्य उत्सव

* चित्रकला, अवयवांची प्रदर्शनी ठरली लक्षवेधी

अमरावती/22 जानेवारी : अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयात ’शौर्य उत्सव’ स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने नवोदित डॉक्टर विद्यार्थ्यांनी आपल्या वैद्यकीय अभ्यासाचा ताण बाजूला सारून कलागुणांच्या माध्यमातून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र समाजापर्यंत पोहोचवला आहे. चित्रकला, शरीररचनेच्या जिवंत प्रतिकृती आणि वारली पेंटिंग अशा विविधांगी कलाकृतींमधून या विद्यार्थ्यांनी केवळ आपली सर्जनशीलताच सिद्ध केली नाही, तर मानवी शरीराची गुंतागुंत अत्यंत सोप्या भाषेत प्रदर्शनीच्या रूपाने मांडली. 19 ते 30 जानेवारी दरम्यान चालणार्‍या या महोत्सवात क्रीडा स्पर्धांनंतर आयोजित करण्यात आलेल्या या कला प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली असून, वैद्यांनी जोपासलेला हा आरोग्याचा छंद समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.सोमवार, 19 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता या कला प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन झाले. मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके यांची प्रमुख उपस्थिती आणि महाविद्यालयाचे संचालक डॉ. रविंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी परीक्षक म्हणून पियुष जोशी आणि डॉ. राहुल बनारसे यांची उपस्थिती लाभली. या महोत्सवातील ’आर्ट गॅलरी’मध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे जणू बोलत असावीत असा भास होत होता. विशेषतः ’शरीरम 2026’ या उपक्रमांतर्गत हाताने तयार केलेले मानवी अवयवांचे नमुने वैद्यकीय शिक्षणाची प्रगल्भता दर्शवत होते. अष्टांग आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सेची माहिती देणार्‍या कलाकृतींनी आयुर्वेद शास्त्राचा गौरव वाढवला. डॉ. माधुरीताई चेंडके यांनी विद्यार्थ्यांच्या या परिश्रमाचे कौतुक करताना सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपली संवेदनशीलता कलेच्या रूपात जिवंत ठेवली असून, यातून समाजाला आरोग्याचा संदेश मिळत आहे. डॉ. रविंद्र वाघमारे यांनी स्पष्ट केले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, जो भविष्यात रुग्णसेवा करताना अत्यंत मोलाचा ठरतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. अतुल जैन यांनी केले, तर प्राचार्य डॉ. संजय चोपकर, डॉ. वैशाली वानखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन साक्षी गांडोळे व गौरी बनपुरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिक खडसे यांनी मानले. शरीररचना आणि कलेचा संगमया प्रदर्शनात ’शरीरम 2026’ हे विशेष आकर्षण ठरले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मानवी शरीरातील गुंतागुंतीचे अवयव हाताने बनवलेल्या प्रतिकृतींद्वारे हुबेहूब साकारले होते. अष्टांग आयुर्वेद, पंचकर्म आणि वारली चित्रकलेच्या माध्यमातून प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धतीचे महत्त्व अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मांडण्यात आले, ज्याची परीक्षकांनी विशेष दखल घेतली.

संबंधित बातम्या

Back to top button