ठाणेदारांनी सकाळी 9 वाजता ठाण्यात हजर असणं अनिवार्य

पोलिस आयुक्त अरविद चावरियांचे निर्देश

-हजर होताच गृपवर फोटो टाकण्याच्या सूचना
अमरावती / 5 जुलै: नागरिकांच्या तक्रारींचा वेगाने निपटारा व्हावा आणि तपासासाठी अधिनस्थ अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे, याकरिता पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांच्या ठाणेदारांना दिशानिर्देश जारी केले आहे. त्यानुसार आयुक्तांनी ठाणेदारांना सकाळी 9 वाजता पोलिस स्टेशनमध्ये हरज होणे अनिवार्य केले आहे. 9 वाजता ठाण्यात पोहोचून आयुक्तालयाच्या वॉट्सअप गृपवर फोटो काढून टाकण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. रात्री 9 वाजता पोलिस स्टेशनमधून ड्युटी संपवून परतताना याच प्रक्रियेचा अवलंब करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहे.
पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्विकारल्यानंतर सकाळी एकट्यानेच वॉकच्या निमित्ताने पायदळ बाहेर पडून नागरिकांशी चर्चा करण्याच्या पद्धतीचा अवलंब केला होता. त्यातून त्यांनी सुरक्षेसंदर्भात शहरातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून त्यानुसार ते पोलिस यंत्रणेत सुधारणा घडवून आणत आहेत. अमरावती शहरातील बहुतांश ठाण्यांचे ठाणेदार सकाळी 10 वाजता ठाण्यात येतात आणि दुपारी 2 वाजता निघून जातात. त्यानंतर ते थेट सायंकाळी 6 वाजताच पोलिस ठाण्यात दिसतात. यादरम्यान संबंधित हद्दीत कोणता गुन्हा घडला तर कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आवश्यक निर्णय घेताना अडचणी निर्माण होतात. तसेच तक्रारी घेउन येणार्‍या नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळेच पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सर्व ठाणेदारांना सकाळी 9 वाजता पोलिस स्टेशनमध्ये हजर होणे अनिवार्य केले आहे.
सोबतच सकाळी 9 वाजता पोलिस स्टेशनमध्ये पोहोचताच पोलिस निरिक्षकांना फोटो काढून वॉट्सअप गृपवर तो अपलोड करुन त्याची सूचनाही द्यावी लागणार आहे. त्याप्रमाणे रात्री 9 वाजता पोलिस ठाण्यातून जातानाही फोटो गृपवर टाकावा लागेल तसेच रोड कॉलिंगही होणार आहे. त्याशिवाय सकाळी पोलिस नियंत्रण कक्षाशी कॉल करुन संपर्क साधावा लागेल. या प्रक्रियेतून ठाणेदारांच्या हजेरीची नोंद होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी आयुक्त अरविंद चावरिया यांनी हा निर्णय घेतला आहे. शहरात केव्हाही मोठे गुन्हे घडू शकतात. तसेच सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी घेउन पोलिस ठाण्यात येउ शकतात. अशावेळी 24 तास वरिष्ठ पोलिस अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. अनेकदा निर्णय घेताना ठाणेदारांची उपस्थिती गरजेची ठरते. त्यांच्याकडून उचित मार्गदर्शन व कारवाईबाबत दिशानिर्देश न मिळाल्यास तपासात अडथळे येउ शकतात. त्यामुळे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी उचललेले हे पाउल महत्वपूर्ण समजले जात आहे.
-दररोज विविभ विभागांचा घेतात आढावा
पोलिस आयुक्त अरविंद चावरिया दररोज सकाळी वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडून वेगवेगळ्या भागात पोहोचतात आणि तेथील सुरक्षेबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतात. ते नागरिकांशी चर्चा करुन समस्याही जाणून घेतात. कायदा आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनासंदर्भात त्यांच्याकडून तत्परतेने निर्णय घेतले जात आहेत. नागरिकांना पोलिस ठाण्यात आल्यानंतर न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, यासाठी ते तत्पर असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button