मतदानाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील मतदान केंद्रांची मनपा आयुक्तांकडून तपासणी
मतदान केंद्रावर क्युआर कोडची व्यवस्था

अमरावती/14 जानेवारी – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण लोकशाही प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवरील सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून आज बुधवार, दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील प्रमुख मतदान केंद्रांची सविस्तर पाहणी केली. यावेळी रामकृष्ण शाळा, गर्व्हमेंट इंजिनिअरिंग कॉलेज तसेच व्ही.एम.व्ही. कॉलेज येथे उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांना मनपा आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन मतदानासाठी करण्यात आलेल्या सर्व सोयी-सुविधांचा आढावा घेतला. मतदान केंद्रांची भौतिक व्यवस्था, मतदान कक्षांची मांडणी, ईव्हीएम सुरक्षितता, मतदार मार्गदर्शनासाठी लावण्यात आलेल्या सूचना फलक, तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या विशेष सुविधांची त्यांनी तपासणी केली.
मतदान प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधत सुरक्षा व्यवस्थेचीही माहिती त्यांनी घेतली. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ, कर्मचारी नियुक्ती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला. मतदानाच्या दिवशी वेळेवर मतदान केंद्र शोधण्याकरीता होणारा गोंधळ टाळण्याकरीता QR कोड स्कॅन करा व आजच आपले मतदान केंद्र जाणुन घ्यावे असे यावेळी आयुक्तांनी केले. सदर QR कोड प्रत्येक मतदान केंद्रावर लावण्यात आला आहे.
पाहणीदरम्यान मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संबंधित अधिकार्यांना मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासनाने सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून मतदारांना सुरक्षित, सुलभ व निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.या निवडणुकीत अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागातील दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.




