स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने बडनेरा झोनमध्ये अतिरिक्त आयुक्तांची पाहणी

अमरावती /5 फेब्रुवारी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आज 5 फेब्रुवारी 2026 रोजी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी झोन क्रमांक 4 बडनेरा अंतर्गत येणार्‍या प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती परिसरात पाहणी केली. या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी महानगरपालिकेच्या तसेच कंत्राटदारामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या स्वच्छता कामगारांची हजेरी तपासणी केली. स्वच्छता कर्मचारी वेळेवर उपस्थित राहून आपले कर्तव्य पार पाडत आहेत की नाही, याची प्रत्यक्ष खातरजमा त्यांनी केली. अनुपस्थिती, कामातील दिरंगाई अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यानंतर त्यांनी प्रभागातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये ॠतझ परिसर, आठवडी बाजार, माळीपुरा, दुर्गापूर रोड, झिरी रोड, नांना-नाणी पार्क परिसर, जयस्तंभ चौक तसेच बडनेरा बसस्थानकाच्या बाजूचा परिसर यांचा समावेश होता. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, रस्त्यांवरील कचरा उचल, नाल्यांची साफसफाई, तसेच बाजार परिसरातील स्वच्छतेची स्थिती याबाबत त्यांनी सविस्तर निरीक्षण केले. पाहणीदरम्यान नागरिकांची वर्दळ अधिक असलेल्या भागांमध्ये स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सुधारात्मक उपाययोजना तात्काळ राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित असलेले स्वास्थ निरीक्षक मेघराज डेंडवाल व सुमेध मेश्राम यांना स्वच्छतेच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, कामगारांची नियमित तपासणी करण्याचे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागाने सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहराचा दर्जा उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबविण्यात येत असून, अशाच प्रकारे सर्व झोनमध्ये नियमित पाहणी, नियंत्रण व मार्गदर्शन सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सांगितले. यावेळी स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक श्र्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button