प्रत्येक क्षेत्राच्या आर्थिक प्रगतीत राजस्थानी समाजाचे महत्वपूर्ण योगदान

आयुक्त सौम्या शर्मा आणि सीपी अरविंद चावरिया यांचे प्रतिपादन

-राजस्थानी हितकारम मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
-विजयादेवी मुंधडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन
-सत्काराने विद्यार्थी-विद्यार्थीनी व पालक भारावले
अमरावती / 7 जुलै: राजस्थानी समाजाने काश्मिरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून तर कामरुप पर्यंत देशाच्या सर्व भागात जावून आपली छाप पाडली आहे. त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून आपला व्यवसाय केला. संबंधित क्षेत्राच्या आर्थिक प्रगतीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. असे गौरवपूर्ण प्रतिपादन अमरावती महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा आणि पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी केले.
राजस्थानी हितकारक मंडळाच्यावतीने इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सत्कार सोहळा रविवारी हॉटेल महफिल इनच्या सभागृहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौम्या शर्मा आणि अरविंद चावरिया बोलत होते. दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मुद्येसूद मार्गदर्शन करताना जीवनात यश मिळविण्यासाठी प्रेरित केले. स्व. विजयादेवी मुंधडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सचिव रामेश्वर गग्गड, वरिष्ठ समाजसेवी लप्पी उर्फ चंद्रकांत जाजोदिया, कमलकिशोर मालाणी, संयोजक गोपाल चांडक, होटल महफिल इनचे संचालक गोपाल मुंधडा, राजस्थानी हितकारक मंडळाचे संरक्षक पं. देवदत्त शर्मा आदि उपस्थित होते.

-उत्कृष्ठ व प्रेरणादायी आयोजन
पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. राजस्थानी हितकारक मंडळातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याची परंपरा जपली जाते, हे एक उत्कृष्ठ आणि प्रेरणादायी आयोजन आहे, अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कौतूक केले. माझा जन्म महाराष्ट्रात झाला असून शिक्षण व नोकरीमुळे मी महाराष्ट्रातच स्थायिक झालो. आम्ही जेथे राहतो तेथील भाषा आम्हाला अवगत असली पाहिजे. संविधानाने सर्वांना आपल्या भाषेचा वापर करण्याचा अधिकार दिला आहे. मी संविधानाचा रक्षक म्हणून प्रशासकिय सेवा देत आहे. असे चावरिया म्हणाले.
ज्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला, त्यांनी आपल्या जीवनातील पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता त्यांची पुढील परिक्षा सुरु होणार आहे. त्यासाठी त्यांनी तयार असायला हवे. यश मिळविण्यासाठी अंगी जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, अशा शब्दात चावरिया यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

-केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे
अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावून कुटुंबापासून लांब राहावे लागते. तुम्हाला कुटुंबिय जेव्हा शिक्षणाकरिता बाहेर पाठवते, तेव्हा त्यांना तुमच्याकडून फार अपेक्षा असतात. त्यांचा अपेक्षाभंग न करता कुटुंबियांची इच्छा पूर्ण करण्यावर तुमचा भर असला पाहीजे. त्यासाठी तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहीजे. वाईट संगत टाळली पाहीजे, असा सल्ला पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिला. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी केवळ नोकरीच्या मागे न लागता वाडवडिलांनी उभा केलेला व्यवसाय सांभाळण्यासाठी कुटुंबाच्या पाठीशी तुम्ही उभे राहीले पाहीजे. यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रमांना पर्याय नाही. तुम्हाला जीवनात यशाचे उंच शिखर गाठता येईल, असेच लक्ष्य तुम्ही निश्चित करायला हवे. असे ते म्हणाले. मुले जीवनात समोर जाण्यासाठी प्रयत्न करित असताना त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभणे गरजेचे आहे, त्यामुळे पालकांनी स्वत:ची स्वप्ने मुलांवर थोपण्यापासून स्वत:ला लांब ठेवले पाहीजे, असा सल्ला चावरिया यांनी दिला.

-अशा आयोजनातून मुलांचा आत्मविश्वास वाढतो
महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी आपल्या भाषणातून आयोजकांची प्रशंसा केली. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला समाजाशी जवळीक साधण्याची संधी मिळाली. अशा आयोजनांमधून मुलांचा आत्मविश्वास व मनाबल वाढण्यास मदत मिळते. जीवनात आणखी चांगले करण्यासाठी ते प्रेरित होतात. राजस्थानी समाजाचे प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. असे त्या म्हणाल्या. केवळ पदवी मिळविणे एवढाच मुलांसाठी शिक्षणाचा अर्थ असायला नको. तर त्यातून त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून माणूस म्हणून चांगले विचार आत्मसात केले पाहीजे. मुलांना पहिली शिक्षा घरातूनच मिळते. जी त्यांना संस्कारी बनवते. उत्तम मार्गदर्शन मुलांना जीवनात सावरण्यासाठी उपयोगी पडू शकते. आजही समाजात मुला-मुलींमध्ये भेद केला जातो. मुलींनाही मुलांप्रमाणे वागणूक देउन त्यांना समान संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन सौम्या शर्मा यांनी केले. आता राजस्थानी समाज केवळ व्यापार आणि व्यवसायापर्यंतच मर्यादित राहीलेला नाही. आज नोकरीच्या क्षेत्रातही उच्चपदावर राजस्थानी समाजातील प्रतिनिधी कार्यरत आहेत, असे त्या म्हणाल्या.

-राजस्थानी युवकांनो नोकरी निर्माण करणारे बना
यावेळी बोलताना राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, 2007 साली मंडळाद्वारे राजस्थानी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या महोत्सवाची छबी आजच्या या अभिनंदन सोहळ्यात दिसून येत आहे. मंचावर विराजमान मान्यवर अधिकार्‍यांच्या वक्तव्यातून राजस्थानी समाजाने मोठी उंची गाठली असल्याचे प्रतित होत आहे. आजच्या कार्यक्रमात 90 पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येत आहे. एवढेच नाही तर अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघात आज समाजाची लोकसंख्या 40 हजारांवर पोहोचली आहे. ही समाजासाठी गौरवशाली बाब आहे. लप्पी जाजोदिया आणि गोपाल मुंधडा यांच्यासारख्या समाजातील यशस्वी व्यक्तींना कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. आजच्या काळात तरुण पिढीचे लक्ष्य शिक्षणानंतर केवळ नोकरी प्राप्त करणे, एवढेच मर्यादित असते. मात्र राजस्थानी युवकांनी या संकुचित विचारधारेला छेद दिला पाहीजे. असे सांगताना अनिल अग्रवाल यांनी समाजातील युवकांनी नोकरी मिळविणारे नाही तर नोकरी निर्माण करुन ते इतरांना मिळवून देणारे बना, असे आवाहन केले. राजस्थानी समाजात आता रोटी-बेटीचा व्यवहारही सुरु झाला आहे, त्याबद्दल अग्रवाल यांनी समाजाचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

Back to top button