आ.सुलभा खोडके व यश खोडके यांच्या हस्ते सत्कार

टेबल टेनिस खेळाडू हनिश बोहरा, ईश्वरी धावडे, आदित्य अंश्रडे यांचा

अमरावती/22 जानेवारी – अमरावती विभागात आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत अमरावतीच्या लेकरांनी आपल्या खेळाची जबरदस्त चुणूक दाखवत राज्याच्या नकाशावर जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. टेबल टेनिसच्या रणांगणात हनिश बोहरा ईश्वरी धावडे आणि आदित्य अंलडे या त्रिमूर्तीने आपल्या धारदार खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. 5 आणि 6 डिसेंबर रोजी अमरावतीत पार पडलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणीतून या खेळाडूंची झेप थेट औरंगाबाद येथील राज्यस्तरीय स्पर्धेत झाली. तेथेही आपल्या जिद्दीच्या जोरावर हनिश आणि ईश्वरीने उपविजेतेपद पटकावले तर बाल गटात आदित्यने तृतीय क्रमांक मिळवून अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशाबद्दल आमदार सुलभाताई खोडके आणि युवा नेते यश खोडके यांनी या खेळाडूंचे विशेष कौतुक करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अमरावती जिल्हा टेबल टेनिस संघट नेच्या मार्गदर्शना खाली आणि प्रसिद्ध प्रशिक्षक शहजाद खान यांच्या देखरेखी खाली तयार झालेल्या या खेळाडूंनी औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्याच्या महाकुंभात मोठी मजल मारली. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात हनिश बोहरा याने बीडच्या शौर्यवर्धन शिनगारेला अटीतटीच्या लढतीत झुंज देत रौप्य पदक आपल्या नावे केले. मुलींच्या गटात ईश्वरी धावडे हिने सोलापूरच्या वेदांतिकालक्ष्मी पाटील सोबत अत्यंत चुरशीचा सामना खेळून उपविजेतेपदावर मोहोर उमटवली.

संबंधित बातम्या

Back to top button