महावितरणच्या वाढीव वीज बिलांची कार्यालयासमोरच होळी

सालेपूर ग्रामस्थांचा संताप भडकला, नवीन मीटरविरोधात महिलांचा धडक मोर्चा

जुने मीटर लावा, अन्यथा बिल न भरण्याचा नागरिकांचा इशारा 

परतवाडा /20 नोव्हेंबर : ग्रामीण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढीव वीज बिलांच्या तक्रारी सातत्याने वाढत असताना आज सालेपुर गावातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत संताप व्यक्त केला. विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने दाखल होत हातात आलेली अवाजवी वीज बिले कार्यालयासमोर जाळून तीव्र निषेध नोंदवला.
सालेपुरमध्ये जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान महावितरणकडून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यात आले. मात्र नवीन मीटर बसविल्यानंतर बिलात अचानक दुपटीने वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण गावातच चिंता आणि रोष फुलला. घरगुती वापरामध्ये कोणतीही वाढ नसताना अवाढव्य बिल आकारले जात असल्याने ग्रामस्थ अक्षरशः धास्तावले. ना घरात उद्योग, ना कारखाना तरी एवढे प्रचंड बिल का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
वाढीव बिलांबाबत योग्य स्पष्टीकरण मिळावे म्हणून ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयातील अधिकार्‍यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकार्‍यांकडून मिळालेली उत्तरे समाधानकारक नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे राग कळसास पोहोचला आणि महिलांनीच आघाडी घेत कार्यालयाबाहेर बिलांची होळी करत निषेध नोंदवला. महिलांनी आणि गावकर्‍यांनी एकमुखाने नवीन मीटर नको, जुने मीटर त्वरित पुनर्बसवा अशी मागणी केली. अन्यथा आलेली वाढीव वीजबिले न भरण्याचा ठाम पवित्रा घेतला. आंदोलनादरम्यान कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरणही निर्माण झाले. ग्रामस्थांनी पुढे इशारा दिला की, महावितरणने समस्येला गांभीर्याने घेतले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन उभारले जाईल.या संपूर्ण घडामोडीकडे आता वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता काय निर्णय घेतात, याकडे परतवाडा आणि सालेपुर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button