शेतकर्‍यांचा मालाला दुप्पट भाव मिळण्यासंदर्भात पाठपुरावा करेल

आ.रवि राणा यांची ग्वाही

अमरावती/8 मार्चअमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील आष्टी येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा 1 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला आमदार रवि राणा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून नागरिकांच्या महसुली समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
या प्रसंगी आ. रवि राणा यांनी उपस्थित अधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, शासनाच्या विविध योजना व सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.
गावातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित समस्या जसे की जमीन नोंद, सातबारा, नामांतरण, प्रमाणपत्रे आदी बाबींमध्ये अडचणी येत असल्यास त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. शिबिरात बोलताना आ. रवि राणा यांनी ग्रामीण भागातील घरकुलाच्या प्रश्नावर विशेष भर दिला. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अंतर्गत गावातील प्रत्येक गरजू कुटुंबाला घरकुल मिळावे यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ग्रामीण भागातील घरकुलासाठी मिळणारे अनुदान सध्या दीड लाख रुपये असून ते वाढवून अडीच लाख रुपये करण्यात यावे यासाठी माजी खासदार सौ.नवनीत राणा यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर बोलताना आ. रवि राणा म्हणाले की, शासनाच्या एखादी योजना बंद पडली तरी चालतील, मात्र शेतकर्‍यांच्या पिकाला योग्य भाव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी टिकला तरच देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाला किमान दुप्पट भाव मिळावा यासाठी आपण स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या राजस्व समाधान शिबिराला तिवसा मतदार संघाचे आमदार राजेश वानखडे, धडझ तालुका अध्यक्ष मंगेश इंगोले, गट विकास अधिकारी प्रविण वानखडे, तहसीलदार अक्षय मांडवे, सरपंच दिलीप जवंजाळ, उपसरपंच दिनेश उवले, आशिष कावरे, आनंद टापरे तसेच देरे साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरामध्ये नागरिकांनी विविध महसुली समस्यांबाबत अर्ज सादर केले असून संबंधित अधिकार्‍यांनी त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांच्या अनेक प्रलंबित महसुली प्रश्नांना मार्ग मिळणार असून शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी राजु हरणे, निरज गवई व असंख्य भातकुली तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button