मोर्शी मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचे 3 ऑगस्टला भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायाभरणी

-खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नांना यश
-अमरावती विभागात मत्स्य उत्पादन वाढणार
अमरावती / 20 जुलै : मोर्शी तालुक्यात शासकिय मत्स्य विज्ञान महाविद्यालय निर्माण करण्यासाठी राज्यसभा सदस्य खा. डॉ. अनिल बोंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन येत्या 3 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. राज्यातील अनेक मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.
या महाविद्यालयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नीलक्रांतीला हातभार लागणार असून मासे उत्पादनात पश्चिम विदर्भाचेही योगदान वाढणार आहे. अमरावती विभागातील धरणे, जलाशये, तलाव, शेततळे यामध्ये मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास खा. डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला आहे. भोई समाजासह मासेमारी करणार्या सर्वच वर्गातील व्यावसायिकांकरिता यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. तसेच अन्नसुरक्षा साखळी मजबूत करण्याकरिता व खाद्य कौशल्य विकासासाठी या महाविद्यालयाच्या माध्यमातून भर पडणार असल्याचे डॉ. बोंडे यांनी म्हटले आहे.
खा. डॉ. अनिल बोंडे मोर्शी विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करित असताना 2017 पासून त्यांनी मोर्शीत मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली आहे. मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाच्या नलदमयंती सागर या जलाशय परिसरात मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यावेळीच त्यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला होता. त्या अनूषंगाने 8 मार्च 2019 रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत आदेश निघाले व मोर्शी मत्स्य विज्ञान महाविद्यालयाला मंजूरी प्रदान करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आणि पुढे कोविड काळात मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या निर्मितीचे काम थंड बस्त्यात पडले होते.
त्यानंतर 2022 मध्ये डॉ. अनिल बोंडे यांनी राज्यसभा सदस्य या नात्याने पून्हा पत्राद्वारे मोर्शीच्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी पाठपुरावा सुरु केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे 21 मार्च 2025 रोजी मंत्री मंडळ बैठकीत या महाविद्यालयाला नव्याने मंजूरी प्रदाण करण्यात आली आणि महाविद्यालयाच्या निर्मितीकरिता 202 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला. मोर्शीनजीक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारित असलेल्या 33 हेक्टर प्रक्षेत्रावर या मस्त्य विज्ञान महाविद्यालयाची उभारणी होणार आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरिता प्रात्याक्षिक व संशोधनाची सुविधा राहणार आहे. ही जागा मत्स्य व्यवसाय विभागाने 20 मे 2025 रोजी विद्यापीठास हस्तांतरित केली आहे. मोर्शी येथील 4.08 हेक्टर जागेवर इमारतीचे बांधकाम होणार आहे. हा भूखंडसुद्धा जलसंपदा विभागाकडून विद्यापीठाला वर्ग करण्यात आला आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून 500 लक्ष मत्स्य बीज निर्मितीचे उद्दीष्ठ पूर्ण करण्याचे शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे लक्ष्य आहे.




