सरकारकडून 10 हजार मतदार वगळण्याची ऑफर!

बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

-म्हणाले, पुरावे आहेत-मीडियासमोर आणणार
-निवडणूक प्रक्रियेवर नवे प्रश्नचिन्ह
अमरावती / 17 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीतील मत चोरीच्या आरोपांवरून देशभरात राजकीय वर्तुळ तापलेले असतानाच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी रविवारी एक स्फोटक दावा करत खळबळ उडवली आहे. सरकारमधील लोकांकडून मला मतदान न करणार्‍यांची दहा हजार मतदारांची लिस्ट मागितली होती. ते वगळून टाकू, आणि त्याजागी दुसरी दहा हजार मते घालू अशी ऑफर देण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
कडू म्हणाले, हे आमच्याकडून शक्यच नव्हतं. हे सरकारमधलेच लोक करू शकतात. आपले लोक कसे निवडून आणायचे यासाठी ही ऑफर आली होती. मी दिलेली नावे, त्यावेळचं संभाषण, रेकॉर्डिंग, सर्व माझ्याकडे पुरावा म्हणून आहे. वेळ आल्यास ते मीडियासमोर मांडीन. पत्रकारांनी विचारले की, तुम्ही ही ऑफर स्वीकारली का? यावर कडू म्हणाले, नाही. ते बरे वाटले नाही. आम्हाला खात्री होती की आपलेच लोक निवडून येतील. म्हणूनच आम्ही ती ऑफर नाकारली.
याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच पत्रकार परिषदेत थेट निवडणूक प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेचे पुरावे दाखवत मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 नंतर मतांची संख्या अचानक वाढली, अनेकांच्या नावाची वेगवेगळ्या मतदारसंघात नोंद आहे, मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले, असा दावा केला होता. त्यांच्या आरोपानंतर आता बच्चू कडूंच्या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगावर आणखी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या या गंभीर आरोपांवर आयोग काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बच्चू कडूंच्या या स्फोटक दाव्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button