बॉम्बची अफवा पसरविणारा गणेश केातवालीतून पसार
काही वेळानंतर बडनेरातून पून्हा अटक

-घटनेने पोलिसांचा हलगर्जीपणा उघड
अमरावती / 13 जुलै: काही दिवसांपूर्वी शहरातील जवाहर रोड स्थित सरोज टॉकिज आणि अन्य काही जागांवर बॉम्ब ठेवली असल्याची अफवा पसरविल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी गणेश तिवारी हा आज पहाटे पोलिसांना चकम देउन शहर कोतवाली ठाण्यातून पसार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र काही वेळातच पोलिसांनी तातडीने हालचाल करुन बडनेरा रेल्वे स्थानकावरुन त्याला अटक केली. मात्र या प्रकारामुळे पोलिसांचा हलगर्जीपणा उघड झाला असून पोलिस ठाण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगढचा रहिवासी असलेला गणेश तिवारी सरोज चौकातील एका प्रतिष्ठानात कामाला होता. सतत दोन दिवस त्याने पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन सरोज टॉकिज, बालाजी मंदिर परिसर आणि गुजरात कांती भवन या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली होती. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शहरात खळबळ निर्माण होउन या भागात दशशतीचे वातावरणही पसरले होते. शोधमोहिमेत काहीच आढळून न आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र त्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान सायबर विभागाच्या मदतीने पोलिस फोनवरुन बॉम्बची खोटी माहिती देणार्या गणेश तिवारीपर्यंत पोहोचले होते. शुक्रवारी सकाळी त्याला सरोज चौकातील दुकानातून अटक करण्यात आली होती. त्याला शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले असता आज पहाटे त्याने ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्यांना शौचाला जायचे असल्याचे कारण सांगितले. त्यासाठी गणेशला कोठडीतून बाहेर काढण्यात आले. यावेळी कर्मचारी बेसावध असल्याची संधी साधून गणेश तिवारीने त्यांना चकमा दिला आणि पोलिस स्टेशनच्या कपाउंड वॉलवरुन उडी मारुन तेथून पळ काढला.
या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात चांगलीच खळबळ उडाली. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना तातडीने याची माहिती देउन गणेशला पकडण्याची मोहिम सुरु करण्यात आली. पोलिस ठाण्यातून पळाल्यानंतर गणेश तिवारी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचला होता. रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच तेथे पोहोचलेल्या पोलिसांच्या एका पथकाने त्याला जेरबंद केले आणि पून्हा शहर कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. सुदैवाने गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या गणेश तिवारीला अटक करण्यात यश आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गणेश पसार होण्यासाठी पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याने ड्युटीवरील संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.




