गजानन महाराज म्हणजे मूर्त झालेले अव्यक्त परब्रम्हा रुप

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

* गण गण गणांत बोतेचा गजर

अमरावती /30 नोव्हेंबर – परमहंस स्थितीच्याही पलीकडे गेलेले शेगावीचे श्री गजानन महाराज म्हणजे मूर्त झालेले अव्यक्त परब्रम्हाचे सगुण, साकार रूप. चैतन्याची जागती ज्योतच! आपल्या या दिव्य अवतार – कार्यकाळात त्यांनी आपल्या अनेक भक्तांना कृतार्थ केले, संकटमुक्त केले, इतकेच नव्हे, तर समाधिस्थ झाल्यानंतरही हजारोनां त्यांनी आपल्या अस्तित्वाचे अनुभव दिले. आजही हजारो लोकांना तसे अनुभव मिळत आहेत. त्यातलीच मी एक. माझं तर ते दैवतच आहे. हृदयात कायम स्थित झालेलं रुपड आहे. अशा या थोर दत्तावतारी विभूतीचं ध्यान प्रत्येकाच्या मनात ठसावं, श्रीचरणी त्यांची भक्ती जडावी,संसार करता – करता परमार्थाची खीर त्याच्या पानात पडावी आणि समाधानाची ढेकर त्यांना तृप्त मनाने देता यावी. ह. भ. प. श्री दासगणू महाराज आशीर्वादित // श्री गजानन महाराज भक्तविजय // या ग्रंथावर भाव ठेवा आणि निष्ठेने त्याचे पठन, मनन, चिंतन करा. तुम्हाला निश्चितच अदभूत अनुभव येतील, यात मला तिळमात्र शंका वाटत नाही. मी श्रीसमर्थभक्तीचा आणि त्यांच्या अदभूत दैवी शक्तीचा क्षणोक्षणी अनुभव घेतेय. त्यांच्या कृपेच्या अमृतवर्षावात न्हाऊन निघतेय. तुम्हीही तसाच अनुभव घ्या आणि या भवसागरातून पार व्हा, एव्हढीच इच्छा आहे. आणि श्री संत गजानन महाराज माऊली चरणी हीच प्रार्थना आहे. असे प्रतिपादन आ.सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी श्रीक्षेत्र शेगाव ( बुलढाणा ) येथील अमरावती ते शेगांव पायी वारी दुर्गा माता मंदिर परिसर,शेगांव येथे कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अमरावती येथून दिनांक 24/11/2025 रोजी अमरावती येथून अमरावती ते शेगांव या पायी वारीला सुरुवात झाली. ही पायी वारी शनिवारी श्रीक्षेत्र शेगांव येथे दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता दुर्गा मंदिर परिसर शेगांव येथे पोहोचताक्षणी आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ’ ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज ’ यांच्या पालखीस नमन – पूजन – वंदन करण्यात आले.
याप्रसंगी वंदना श्रीकांत चावजी, मीनल सवई,योगेश सवई, दीपक यादव, डॉ. प्रशांत गहुकार, सचिन मोहोड, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, दिगंबर पोफळी, गणेश घुलक्षे, राजेंद्र महल्ले, दीपक पैकीने, माधव राऊत, संदीप औशिकर, अक्षय पळसकर, स्मिता भुयार, जयंत पैकीने, प्रवीण अळसपुरे, अजिंक्य काळे आदिसहित अमरावती ते शेगांव पायी वारी समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच संपर्क सेवेकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button