बाजार समितीचे माजी संचालक गोपाल राणे यांची आत्महत्या

राहत्या घरीच घेतला गळफास

-पोलिसांना मिळाली सुसाईड नोट
-कट्टर शिवसैनिक होते राणे
अमरावती / 19 जून: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि शिव सहकार सेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल राणे यांनी आज सकाळी आपल्या राठी नगर स्थित निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. 50 वर्षीय गोपाल राणे हे कट्टर शिवसैनिक आणि दिवंगत माजी आमदार संजय बंड यांचे खंदे समर्थक होते. त्यांनी उचललेल्या या आत्मघाती पावलामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार गोपाल राणे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी आपल्या पत्नीसह मॉर्निंग वॉकला गेले होते. साडे सहा वाजताच्या सुमारास ते घरी परतले आणि थेट आपल्या खोलीत गेले. सकाळी 9 वाजतापर्यंत ते खोलीतून बाहेर आले नाही. तेव्हा पत्नी आणि घरातील अन्य सदस्यांनी त्यांना चहा घेण्यासाठी आवाज दिला. मात्र खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. खोलीचे दारही आतून बंद होते. तेव्हा घरच्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता गोपाल राणे हे गळफास घेउन लटकलेल्या स्थितीत दिसून आले. त्यामुळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला.
घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि गोपाल राणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. गोपाल राणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये नेमके काय लिहीले आहे, हे समजू शकले नाही. सुसाईड नोटच्या आधारे तपास करुन गोपाल राणेंच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करित आहेत. गोपाल राणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा पीडीएमसीमध्ये नोकरीला आहे तर मुलगी शिक्षण घेत आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील देवरी निपाणी या गावातील मुळ रहिवासी असलेले गोपाल राणे यांचे वडिल बाबासाहेब राणे हे बाळासाहेब ठाकरेंना माणणारे निष्ठावान शिवसैनिक होते. वडिलांच्या पाउलावर पाउल टाकून गोपाल राणेसुद्धा शिवसेनेत सक्रिय झाले आणि त्यांनीही स्वत:ची एक कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण केली होती. माजी आमदार संजय बंड यांचे ते खंदे सहकारी होते. सहकार क्षेत्रातील राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

संबंधित बातम्या

Back to top button