फुटेज हाती, पण आरोपी हाताबाहेर!
बडनेरा रेल्वे पोलिसांचा फज्जा-दोनदा सोलापुरात जाऊनही रिकाम्या हाताने परत

* हावडा-मुंबई मेलमध्ये 3 कोटींचं सोने गायब!
* शातीर टोळीचा मास्टरस्ट्रोक, पोलिस यंत्रणेची घोर फजिती
अमरावती/ 5 नोव्हेंबर -जळगावच्या सराफा व्यापार्याच्या 3 कोटी रुपयांच्या सोन्याच्या चोरीचा तपास आता रेल्वे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. फुटेज हाती असूनही आरोपींचा माग पोलिसांना लागत नाही. दोन वेळा सोलापुरात जाऊनही पथक बैरंग परत आले. त्यामुळे बडनेरा रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 12 ऑक्टोबर रोजी जलगाव येथील संभव ज्वेलर्स चे संचालक किशोर वर्मा (46) हे व्यवसायानिमित्त अमरावतीत आले होते.
दिवसभर व्यवहार आटोपून ते सायंकाळी बडनेरा स्थानकावरून हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस पकडण्यासाठी आले. त्यांनी 2.34 किलो सोने (मूल्य तब्बल 3 कोटी रुपये) असलेली बॅग जनरल डब्यात ठेवली आणि हात धुण्यासाठी गेले. त्या क्षणीच शातीर चोरट्यांनी क्षणात बॅग उचलून नेली. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी निर्भयपणे बॅग हातात घेऊन प्लॅटफॉर्मवरील जिने चढताना दिसतात. मागे पुढे चालणारे साथीदार त्याला संरक्षण देत असल्याचे स्पष्ट दिसते. सूत्रांच्या माहितीनुसार, चोरटे नंतर स्टेशनबाहेर कारने पसार झाले. तपासात उघड झाले की हे सर्व आरोपी सोलापूर जिल्ह्यातील कुर्दवाडी पोलीस ठाण्याच्या बारलोणी गावचे रहिवासी आहेत. आरोपींचे ठिकाण निश्चित झाल्यानंतर बडनेरा पोलिसांचे दोन पथक सोलापुरात गेले, मात्र आरोपी आधीच फरार झाल्याने दोन्ही वेळा पोलिस रिकाम्या हाताने परतले.
पुरावे हाती, पण कारवाई ठप्प!-सीसीटीव्ही फुटेज, ठिकाणांची माहिती, आरोपींचा माग – सर्व काही पोलिसांकडे असतानाही तपास ठप्प आहे. त्यामुळे हा प्रकार रेल्वे पोलिसांच्या निष्क्रियतेचा आणि व्यवस्थेतील ढिलाईचा ठळक पुरावा ठरत आहे. आता प्रश्न फक्त एकच – 3 कोटींचं सोने उडवणारे हे कुख्यात गुन्हेगार अखेर पोलिसांच्या हाती कधी लागणार?
* आठ जणांची टोळी-स्थानिक संगनमताची चर्चा
या सोन्याच्या चोरीमागे आठ जणांची संघटित टोळी असल्याचे तपासात समोर आले आहे. टोळीचा प्रमुख सोलापुरातील प्रभावशाली व्यक्ती असून त्याच्याकडे पेट्रोलपंप आणि आलिशान घर असल्याचे समजते. स्थानिक पोलिसांशी त्यांची सांठगांठ असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे पोलिस पथक पोहोचण्याआधीच आरोपी ठिकाण बदलत आहेत.




