24 तासांत पाच मृत्यू; आरोग्य यंत्रणेची झोप मोडली
धारणी-चिखलदरा दौर्यात सेवा सुधारण्याचे तातडीचे आदेश

* नवजात आणि मातामृत्यू वाढल्याने तातडीने आढावा
* आरोग्य सुविधा, औषधसाठा व अंगणवाडी केंद्रांची तपासणी
* कुपोषण व मातृ-बाल आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर सीईओंची करडी नजर
धारणी /19 नोव्हेंबर : मेळघाटातील वाढते मृत्यू, कुपोषणाची भीषण समस्या आणि माता-बाल आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी यामुळे प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी धारणी-चिखलदरा तालुक्याचा तातडीने दौरा करत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. केवळ 24 तासांत पाच मृत्यूंची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून उपकेंद्रांपासून रुग्णालयांपर्यंतच्या सेवांची काटेकोर तपासणी सुरू झाली आहे.
दौर्यादरम्यान मोहपात्रा यांनी आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा तसेच अंगणवाडी केंद्रांची कार्यप्रणाली याची तपशीलवार चौकशी केली. उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या त्रुटींवर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यात निष्काळजीपणा करणार्यांवर कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत त्यांनी अधिकार्यांना दिले.
मेळघाटातील माता-बालमृत्यूचे प्रमाण वाढण्यामागे फक्त कुपोषणच नव्हे तर कमी वयातील विवाह, गर्भवती महिलांची तपासणी व उपचारात होणारा विलंब, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याचा अभाव हीही गंभीर कारणे असल्याचे मोहपात्रा यांनी स्पष्ट केले. गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच तपासण्या व योग्य आहार यांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे घटू शकते, असे त्यांनी सांगितले. धारणी तालुक्यात बोगस व तोतया डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याच्या तक्रारींचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. अशा केंद्रांवर तात्काळ चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना देण्यात आले. टीएचओकडून आतापर्यंत झालेल्या कारवाईचे तपशील त्यांनी बैठकीत मागवून जबाबदारी निश्चित करण्यावर भर दिला. अतिदुर्गम भागात काम करणार्या अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींनी दाखवलेल्या मेहनतीचे कौतुक करताना गर्भवती महिला व नवजात शिशूंनी वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांकडे पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे मोहपात्रा यांनी जनतेला उद्देशून सांगितले. प्रशासन आता नियोजनबद्ध आणि कठोर अंमलबजावणीसह मेळघाटातील आरोग्य स्थितीत आमूलाग्र बदल घडवण्यास कटिबद्ध असल्याचा निर्देश त्यांनी दिला.




