प्रशांत नगरात सलूनमधये फायरिंग, परिसरात खळबळ

तीन तरुणांचा मालकाशी वाद

-दुकानावर दगडफेक व गोळीबार
-फ्रेजरपुरा पोलीस व गुन्हे शाखेकडून चौकशी
अमरावती / 28 ऑगस्ट : शहरातील प्रशांत नगर उद्यानाजवळील आयडीयल हेअर सलून येथे झालेल्या गोंधळानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री तीन अज्ञात तरुणांनी सलूनमध्ये गोंधळ घालत दगडफेक केली आणि त्यानंतर सलूनकडे पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर फ्रेजरपुरा पोलीस ठाणे व गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे नऊच्या सुमारास प्रशांत नगरातून एलआयसी कॉलनीकडे जाणार्‍या मार्गावर सर्व दुकाने बंद झाल्यानंतरही जावेद नावाचा व्यापारी आपला आयडीयल हेअर सलून सुरू ठेवून होता. त्यावेळी तीन अज्ञात तरुण दुकानात आले. त्यांचा जावेदच्या मुलाशी वाद झाला आणि तो वाद धक्काबुक्की, हातघाईपर्यंत गेला. परिस्थिती चिघळल्याने जावेदने त्यांना दुकानाबाहेर हाकलून देत शटर खाली ओढले.
यामुळे संतप्त झालेल्या तिन्ही तरुणांनी दुकानासमोर उभे राहून मोठ्याने आरडाओरड, गलिच्छ शिवीगाळ केली आणि दुकानावर दगडफेक सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्यापैकी एकाने पिस्तुल काढून सलूनच्या दिशेने फायर केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. गोळीबाराची खबर पसरताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस व गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत तिन्ही युवक पसार झाले होते. पोलिसांनी सलूनचालक जावेद व त्याच्या मुलाची चौकशी केली असता त्यांनी हा फक्त किरकोळ वाद असल्याचे सांगत तक्रार नोंदवण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर पोलिसांनी थेट ठाण्यात येण्याचे सांगूनही जावेदने टाळाटाळ केली.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आयडीयल हेअर सलूनच्या परिसरातून फायरिंगनंतर पडलेले रिकामे काडतुसे सापडतात का यासाठी दोन पथके शोध मोहिमेवर आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा धागा लावण्यासाठी चौकशी वेगाने सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button