बच्चू कडूंच्या याचिकेवर अंतिम सुनावणी 24 जूनला
जिल्हा बँक अपात्रता प्रकरण हायकोर्टात

अमरावती / 19 जून: माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक व अध्यक्षपदासाठी अपात्र ठरविण्यात आल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवार, 24 जून रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत दै. मातृभूमिला यासंबंधी माहिती दिली.
बच्चू कडू यांना जिल्हा बँकेेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र ठरविणारा निर्णय विभागीय उपनिबंधकांनी दिल्यानंतर त्याला आव्हान देणारी याचिका गत सोमवारी नागपूर खंडीपीठात दाखल करण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्यावतीने अॅड. पराग कडू यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने लगेच विचारार्थ याचिका स्विकार केली होती. न्यायमूर्ती पानसरे यांच्या पीठापुढे आज याप्रकरणात प्राथमिक सुनावणी झाली. बच्चू कडू यांच्या वकिलांनी हायकोर्टाच्याच मागील अनेक निकालांचे दाखले देत, उपनिबंधकांचे आदेश नियमबाह्य असल्याचे मत मांडले आणि बच्चू कडू यांच्या अपात्रतेचा निर्णय रद्द करण्याची विनंती केली.
त्यावर प्रतिपक्षाच्यावतीने वकिल अॅड. डांगरे यांनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. त्यानंतर न्यायालयाने 24 जून ही सुनावणीसाठी पुढील तारिख दिली. मंगळवारी याप्रकरणात न्यायालयाकडून अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान बँक प्रशासन किंवा उपनिबंधकांकडून संबंधित आदेशाची प्रत्र अद्याप बच्चू कडू यांना प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. राजकिय आंदोलनामध्ये आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आधीच स्थगिती देण्यात आली आहे. असे असताना तेच कारण पुढे करुन आपल्याला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र ठरविणे, नियमबाह्य आहे. हे आपल्याविरोधातील राजकिय षडयंत्र आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.




