विधानपरिषद निवडणूक रिंगणात जोरदार रस्सीखेच
प्रवीण पोटे की नितीन धांडे ?

गटबाजीला उधाण, मोर्चेबांधणी सुरु
अमरावती14 मे– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याचे संकेत मिळत असल्याने अमरावती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या 24 वर्षांपासून या जागेवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले असून, सत्ताधारी पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी आता दिग्गज नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील आणि शहर प्रमुख डॉ. नितीन धांडे यांनी या निवडणुकीसाठी शड्डू ठोकल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 70 टक्क्यांहून अधिक मतदार उपलब्ध असल्याने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सर्वच पक्षांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या 59 आणि पंचायत समिती सभापतींच्या 14 अशा एकूण 73 जागा सध्या रिक्त आहेत. मात्र, असे असूनही जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकी साठी आवश्यक असणारी 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदारसंख्या उपलब्ध आहे. यामध्ये अमरावती महानगर पालिकेचे 95 सदस्य, नगरपालिकांचे 324 सदस्य, नगरपंचायतींचे 34 सदस्य आणि 12 नगराध्यक्षांचा समावेश आहे. एकूण मतांच्या तुलनेत जिल्ह्यात 86 टक्के मतदार हजर असल्याने प्रशासकीय पातळीवर या निवडणुकीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि खर्चिक मानली जात असल्याने जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले आहे. माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपला असून, ते आता विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, डॉ. नितीन धांडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेले शक्तीप्रदर्शन हे थेट उमेदवारीसाठीचा दावा असल्याचे मानले जात आहे. पोटे पाटील यांनी 2018 च्या निवडणुकीत विक्रमी 96 टक्के मते घेत काँग्रेसच्या उमेदवाराचा धुव्वा उडवला होता. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगढिया यांना अवघ्या 17 मतांवर समाधान मानावे लागले होते. या ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी पोटे पाटील उत्सुक असतानाच, धांडे यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे. आता भाजप या दोन मातब्बर नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकते, याकडे सर्व सामान्यांचे डोळे लागले आहेत.
पोटे पाटलांचा ऐतिहासिक विजय
गेल्या निवडणुकीत प्रवीण पोटे पाटील यांनी काँग्रेसचा दारुण पराभव करून एकतर्फी विजय मिळवला होता. 489 मतांपैकी त्यांनी विक्रमी मते घेत स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले होते. जुन्या विजयाचा हाच करिष्मा त्यांना पुन्हा उमेदवारी मिळवून देणार का, याची चर्चा आता जिल्ह्याच्या रंगली आहे.




