घुईखेडमध्ये जीव धोक्यात घालत शेतकर्‍यांचा नाल्यातून प्रवास

जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का?

-ग्रामस्थांचा संतप्त सवाल, लोकप्रतिनिधी निशान्यावर
-पुलाची मागणी अनेक वर्षांपासून अपूर्णच
चांदूर रेल्वे/ 13 जुलै: जेमतेम पावसाळा सुरू झाला आहे. पेरणीनंतर जोरदार पाऊस आल्याने आता पुढची कामे जोमात सुरू आहे. मात्र चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील काही शेतकर्‍यांना आपल्याच शेतात जाणे कठीन झाले आहे. मागिल 3-4 दिवसांत आलेल्या संततधार पावसामुळे नाल्याला पुर आला असुन घुईखेड शेतशिवारात जीव धोक्यात घालून शेतकरीवर्ग या नाल्यातून वाट काढताना दिसत आहे. खारवगळ नाल्यावरून पुलाची मागणी अपूर्णच असुन या नाल्याला पूर आल्यास अनेकवेळा मजूर शेतात अडकल्याचेही प्रकार घडले आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील खारवगळ नाल्याच्या पलीकडे अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिन आहेत. मात्र नाल्याच्या पाण्यामुळे पावसाळ्यात अनेक वर्षांपासून शेती वहिवाट करणे खूपच कठीण होत चालले आहेत. बेंबळा धरण झाल्याने पावसाळ्यात पाण्याच्या पातळीत वाढ होवून पर्यायी खारवगळ नाल्याचे पाणी चंद्रभागा नदीत प्रवाहीत न होता संचय होऊन सदर खारवगळ नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होते. सदर पाणी शेत जमिनीत पसरत असल्याने दरवर्षी जवळपास शेती अनुक्रमांक 01 ते 97 गट परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय पाणी संचय पातळीत वाढ होत असल्याने शेती वहिवाट करणे कठीण होवून बसले आहे.
त्यामुळे खारवगळ नाल्यावर पुलाचे बांधकाम पुर्ण होणे गरजेचे आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर पुलाचे बांधकाम होण्याकरिता परिसरातील शेतकर्‍यांनी लोकप्रतिनीधी तसेच प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्या गेले असून आता पावसाळ्यात शेतकर्‍यांना नाईलाजास्तव जीवघेणा प्रवास या नाल्याच्या पुरातून करावा लागत आहे. त्यामुळे आता या पाण्यात एखाद्या शेतकर्‍याचा जीव गेल्यानंतरच लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार का असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे. तर आता या पुलाकरिता प्रशासन दखल घेणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button