आ.प्रवीण तायडे यांच्या कार्यालयासमोर शेतकर्यांचे आंदोलन
अतिवृष्टीच्या निधीला जाणीवपूर्वक विलंब

* शिवीगाळ करणार्या आमदाराचा शेतकर्यांकडून तीव्र निषेध
* मकर संक्रांतीच्या दिवशीही शेतकर्यांनी दाखवला संयम
* आमदारांना तिळगुळ, गोड बोलण्याची विनंती
चांदूरबाजार/14 जानेवारी – तालुक्यातील हजारो शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्णतः उध्वस्त झाले असताना, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याचा आरोप करत आज आमदार प्रवीण तायडे यांच्या कार्यालयासमोर पुन्हा एकदा शेतकर्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. हातात डफडी, तोंडात घोषणा आणि मनात प्रचंड संताप घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले आणि कार्यालय परिसर दणाणून सोडला. अतिवृष्टीने शेतकर्यांची पिके, घरे, शेतीची साधने उद्ध्वस्त झाली. शासनाने जाहीर केलेली मदत मात्र अद्याप कागदावरच असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. वारंवार निवेदने, आंदोलन, तक्रारी करूनही निधी मिळत नसल्याने शेतकर्यांचा संयम आता संपत चालल्याचे चित्र आहे.
निधी नाही, पण शिवीगाळ मात्र मुबलक!-शेतकर्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी आंदोलन करणार्या शेतकर्यांवर आमदारांनी भर सभेत शिवीगाळ केल्याचा आरोप यावेळी पुन्हा करण्यात आला. निधी द्यायचा नाही आणि आवाज उठवला की शिवीगाळ करायची-ही कोणती लोकशाही? असा सवाल उपस्थित करत शेतकर्यांनी आमदारांचा जाहीर निषेध केला.
मकर संक्रांतीसारख्या पवित्र सणालाही आंदोलन-मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद, गोडवा आणि एकोप्याचा संदेश देण्याची परंपरा असताना, शेतकर्यांना मात्र आंदोलन करावे लागत असल्याचे दुर्दैव आंदोलनकर्त्यांनी मांडले. याच दिवशी शेतकर्यांनी आमदारांना तिळगुळ देत गोड बोला, शेतकर्यांशी सन्मानाने वागा आणि आमचा हक्काचा निधी द्या, अशी विनंती केली. मात्र गोडव्यास उत्तर मिळाले नाही, त्यामुळे रोष अधिकच तीव्र झाला.
सत्तेचा माज की शेतकर्यांची अवहेलना?-शेतकर्यांच्या मते, अतिवृष्टीच्या मदतीला होत असलेला विलंब हा प्रशासनिक अपयश नसून जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आहे. शेतकर्यांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असलेल्या आमदारांकडूनच जर अपमानास्पद वर्तन होत असेल, तर न्याय कुठे मागायचा? असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा-जोपर्यंत तालुक्यातील सर्व पात्र शेतकर्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचा निधी जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि मंत्रालयापर्यंत लढा नेला जाईल, असा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला. आजचे डफडी बजाव आंदोलन हे केवळ एक निषेध नसून, शेतकर्यांच्या असह्य वेदनांचा आणि सत्तेच्या उदासीनतेविरुद्धचा प्रखर आक्रोश असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.. शेतकरी कार्यकर्ते गोपाल भालेराव यांचे नेतृत्वात झालेले आंदोलन होते. रमन लंगोटे पवन राऊत, विजय राऊत, रुषिकेश रडके, इरफान सौदागर, अशोक बंड, संविधान मोहोळ, अभिजित पोहोकार, विजय जवजाळ, अभिजित बुटे,गौरव वैद्य, अंकुश धाकडे, प्रभाकर चव्हाण, प्रदिप बंड, शाम पारीसे,. या . मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते




