मशीनमध्ये अडकून शेतकर्‍याचा मृत्यू

सोयाबीन काढणी करताना दुर्दैवी घटना

धामणगाव /12 ऑक्टोबर : सततच्या पावसानंतर मागील आठ-दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, यामुळे शेतकरी पीक काढणीचे काम करत आहेत. अशात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड शेत शिवारात दुर्दैवी घटना घडली. मशीनद्वारे शेतातील सोयाबीन काढणीचे काम सुरू असताना तरुण शेतकरी गौरव कावरे मशीनमध्ये अडकून मृत्यू पावला. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीय हादरले आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी शेतात काढणीचे बाकीचे काम करत आहेत. प्रामुख्याने सोयाबीन आणि मका काढणीला वेग आला असून कापूस वेचणीदेखील सुरू आहे. कावली वसाड शेत शिवारात कापून ठेवलेला सोयाबीन काढणीसाठी मशीन लावण्यात आला होता. मशीनमध्ये कापलेल्या सोयाबीनची झाडे टाकताना गौरव कावरे मशीनखाली अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button