जरुड येथे शेतकर्‍याची गळफास लावून आत्महत्या

नापिक, कर्जबाजारीपणामुळे उचलले टोकाचे पाउल

वरुड / 20 जुलै : सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर कर्जाच्या बोझ्यातुन मुक्त होण्याचे स्वप्न पाहणारा जरुड येथील वृध्द शेतकरी मंगल संपतराव भुते यांचा मुलगा दिनेश भुते (50) याने कर्जाच्या बोझ्याला कंटाळुन 19 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केली.
एकिकडे सततची नापिकी, त्यात क्रांती ज्योती महिला सहकारी पतसंस्थेचे 2 लक्ष रुपये व स्टेट बँकेचे 2 लक्ष रुपयांची कर्जाची चिंता तसेच मुलीच्या 12 वी नंतरच्या पुढील उच्च शिक्षणाची जबाबदारी अशा अनेक अडचणीतुन मार्ग काढत पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यासाठी दिनेश व त्याच्या पत्नीने उसनवारी करुन एडमिशन केली. त्यात दिनेशच्या मुलाचा माध्यमिक शिक्षणाचा खर्च, शेतातील सततच्या नापीकीमुळे मोलमजुरी करुन आपल्या वृद्ध आई, वडीलांसह मुलाबाळांचा उदर निर्वाह करणे, सततच्या नापीकीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक दिवाळे निघाल्याने त्यांचे संपुर्ण कुटुंब अक्षरश: आर्थिक द़ृष्ट्या डबघाईस आले होते.
त्यात स्टेट बँकेचे आणि क्रांतीज्योती महिला सहकारी पतसंस्थेचे कर्ज उरी असल्याने वसुलीसाठी पदाधिकार्‍यांचा सततचा तगादा, यामुळे दिनेशने अखेर टोकाचे पाऊल उचलुन आपल्या राहत्या घरातच गळफास लावुन आपली जिवन यात्रा संपवली असल्याचे बोलले जात आहे. मृतकाच्या पश्चात वृध्द आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा आणि दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व दिनेशचे पार्थिव उत्तरणीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास वरुड पोलिस करीत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button