अमरावती विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार 3 हजार मीटर करा

खा.डॉ.अनिल बोंडे यांची संसदेत आग्रही मागणी

दिल्ली, पुणे, गोवा आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याचे आवाहन

अमरावती / 11 मार्च – अमरावती विमानतळावर तातडीने ’नाईट लँडिंग’ची (रात्री विमान उतरवण्याची) सुविधा उपलब्ध करून देऊन देशाच्या प्रमुख शहरांशी विमानसेवा जोडण्याचा मुद्दा भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी संसदेत उपस्थित केला. राज्यसभेतील शून्य प्रहरात त्यांनी नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या कडे अमरावती हून विविध शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची माग णी केली. त्यांच्या या प्रस्तावावर मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खा. बोंडे यांनी अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 3 हजार मीटरपर्यंत वाढवण्याची मागणी केली. अमरावतीत ’पीएम मित्रा’ टेक्स्टाईल झोनमुळे मोठ्या गुंतवणुकीची शक्यता असून लवकरच येथे ’आयटी पार्क’ही साकारत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासासाठी मोठ्या शहरांशी हवाई संपर्क असणे आवश्यक आहे. त्यामुळे अमरावती ते पुणे-गोवा, अमरावती ते हैदराबाद-तिरुपती आणि अमरावती ते इंदूर-दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू करावी, असे त्यांनी सुचवले. मुंबई-अमरावती विमानसेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आठवड्यातील तीन दिवसांची सेवा आता पाच दिवस करावी लागली आहे. अमरावती हे विभागीय मुख्यालय आणि अंबा देवीचे श्रद्धास्थान असल्याने येथील हवाई कनेक्टिव्हिटीमुळे विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास डॉ. बोंडे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Back to top button