आत्महत्येची धमकी देउन अल्पवयीन युवतीचे शोषण
एक वर्षानंतर तक्रार, बलात्काराचा गुन्हा दाखल

अमरावती / 17 जुलै : इंस्टाग्रामवरुन परिचय झाल्यानंतर एका 27 वर्षीय युवकाने 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला आत्महत्येची धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले आणि नंतर सतत एक वर्ष तिचे लैंगिक शोषण केले. ही घटना अजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पिडित युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर पोस्का कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
गोलू उर्फ मृदुल प्रदीप कोकाटे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पिडितेच्या तक्रारीनुसार एप्रिल 2024 मध्ये तिची गोलू कोकाटेसोबत समाज माध्यमावरुन ओळख झाली. दोघेही एकाच परिसरातील रहिवासी असल्याने संपर्क वाढत गेला. अशातच गोलूने या युवतीला भेटण्यासाठी बोलाविले. तू मला आवडते, असे सांगून त्याने युवतीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. युवतीने नकार दिल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने युवतीसोबत संबंध स्थापित केले.
तो सतत या अल्पवयीन युवतीला धमकावत होता. एक वर्षापासून त्याने या युवतीचे लैंगिक शोषण चालविले होते. आपल्याशी जवळीक ठेवली नाही तर फाशी लावून आत्महत्या करण्याची धमकी तो देत होता. कुटुंबियांना माहिती पडल्यानंतर त्याने युवतीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ केली. बुधवारी त्याने युवतीला मारहाणही केली. गोलू कोकाटेचा जाच असह्य झाल्याने अखेर पिडितेने अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात जावून त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. त्याआधारे गोलू कोकाटेवर बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




