स्वत:च्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला वृद्धाचा मृतदेह

हत्या की आत्महत्या, गूढ कायम

-सुंदरलाल चौकातील घटना
अमरावती / 14 जुलै: स्थानिक चपराशीपूरा परिसरातील सुंदरलाल चौकात गॅस पंपाच्या मागे राहणार्‍या राजेंद्र नामदेव मेटकर या 61 वर्षीय वयस्कर व्यक्तीचा मृतदेह त्यांच्याच घरात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. आज सोमवारी दुपारी समोर आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मेटकर यांनी आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली? याचे गूढ कायम आहे. पोलिसांनी सर्व बाजू तपासत वेगवेगळ्या दिशांनी तपासाला सुरुवात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुंदरलाल चौकात सीएनजी पंपानजीक राहणार्‍या एका व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवरुन माहिती दिली की, त्यांच्या शेजारी राहणार्‍या एका व्यक्तीने आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. माहिती मिळताच शहर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी लगेच दाखल झाले. राजेंद्र नामदेव मेटकर नामव ही वयस्कर व्यक्ती आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी लगेच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतू तेथे डॉक्टरांनी मेटकर यांना मृत घोषित केले.
मेटकर यांच्या घरात सर्वत्र रक्त पसरले होते. फरशी पूर्णत: रक्ताने माखली होती. ज्या पलंगावर मेटकर पडले होते, त्यावरील चादरही पूर्णत: रक्ताने भिजली होती. अशात मेटकर यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, यासंदर्भाने पोलिस संभ्रमात सापडले आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून मेटकर यांच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होउ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button