चालकाने मद्यधुंद अवस्थेत चालविली शहर बस

प्रवाशांसह अन्य वाहनचालकांचा जीव टाकला धोक्यात

-टेंपोलाही दिली धडक, गुन्हा दाखल
अमरावती / 13 जुलै: अमरावती महापालिकेच्या शहर बसच्या चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून प्रवाशां आणि अन्य वाहनचालकांचा जीव धोक्यात टाकल्याचा प्रकार शुक्रवारी, रात्री बडनेरा मार्गावर घडला. सातुर्णा चौकात बस थांबल्यानंतर प्रवाशांसह तेथे हजर असलेल्या नागरिकांनी खाली उतरुन चालकाला घेरल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी आरोपी शहर बस चालकावर गुन्हा नोंदविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी अमरावती महापालिकेच्या आपली परिवहन सेवेतील शहर बस घेउन एक बसचालक बडनेराच्या दिशेने निघाला होता. बस पूर्णत: प्रवाशांनी भरली होती. यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटत असल्याचे प्रवासी आणि त्या मार्गावरुन जात असलेल्या अन्य वाहनचालकांच्या लक्षात आले. बस नागमोडी वळने घेत पळत असल्याने सर्वांचा जीव मुठीत सापडला होता. काही वाहनचालकांना या बसची धडक बसताबसता राहीली.
सातुर्णा चौकात मारुती शोरुमसमोर या दारुड्या बसचालकाने हलगर्जीपणे बस चालवून एका टेंपोलाही धडक दिली. थोड्या अंतरावर समोर वाहन आल्याने चालकाने करकचून ब्रेक लावल्याने बस थांबली. ही संधी साधून प्रवासी लगेच बसमधून बाहेर पडले. त्यांनी चालकाला खाली उतरवून घेरले आणि जाब विचारत त्याला चांगलेच धारेवर धरले. काही वाहनचालक आणि परिसरातील नागरिकही याठिकाणी गोळा झाल्याने मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी चालकाच्या तोंडातून दारुचा उग्र दुर्गंध येत होता. त्याने अंगावर गणवेशही परिधान केला नव्हता.
याबाबत राजापेठ पोलिसांना सुचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चालकाला ताब्यात घेतले आणि पोलिस स्टेशनला नेले. याप्रकरणी ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी आरोपी शहर बस चालकावर गुन्हा नोंदविला आहे. त्याचे शहर बस सेवेतून निलंबन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी प्रवासी व अन्य नागरिकांकडून करण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button