सोबत मद्यप्राशन, नंतर चाकूने भोसकून मित्राची हत्या

रहाटगावच्या एसए बारसमोर रक्तरंजित थरार

-दोन आरोपी फरार, पोलिसांकडून शोधमोहिम
अमरावती / 12 जुलै: पाच मित्रांनी बारमध्ये बसून सोबत रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन केले. बारमधून बाहेर पडल्यानंतर त्यापैकी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. भांडण विकोपाला गेल्यानंतर एका मित्राने दुसर्‍या मित्रावर चाकूने वार केले. त्यात तो जागीच गतप्राण झाला. खूनाचा हा रक्तरंजित थरार शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील एसए इंपेरियल बार अँड रेस्टोरेन्ट समोर घडला. हा संपूर्ण घटनाक्रम बारच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
राजकुमार तहलराम सुंदरानी (52, रा. साई मंदिराजवळ, रामपुरी कॅम्प, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. राजकुमारवर चाकूने वार करणारा शिवा फुलवाणी (42, रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) आणि राजकुमारच्या खूनात त्याला मदत करणारा बंटी पवार (30, लोहार लाईन, विलास नगर, अमरावती) हे दोघेही फरार असून नांदगाव पेठ पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
घटनेची हकीकत अशी की, राजकुमार सुंदरानी आणि शिवा फुलवाणी व बंटी पवार हे मित्र आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमाराव राजकुमार सुंदरानी आपल्या रामपुरी कँप येथील घरी असताना बंटी पवार आणि शिवा फुलवाणी हे त्यांच्याकडे आले. त्यानंतर तिघेही दुचाकीने रहाटगाव येथील एसए इंपेरियल बार अँड रेस्टोरेन्ट येथे पोहोचले. यावेळी त्यांचे आणखी दोन मित्र रवी तेजानी आणि अजय मेटानी (दोघेही रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) हे सुद्धा सोबत होते. बारमध्ये सर्वांनी मद्यप्राशन व जेवण केले. दरम्यान रवी तेजानी आणि अजय मेटानी आधीच निघून गेले.
रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास राजकुमार तसेच बंटी आणि शिवा हे तिघेसुद्धा सर्व आटोपून बारबाहेर पडले. बराच वेळ त्यांच्यात बारसमोरच गप्पागोष्टी सुरु होत्या. अशातच मध्यरात्री 3:30 वाजताच्या सुमारास राजकुमार सुंदरानी आणि शिवा फुलवानी यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन बाचाबाची झाली. भांडण चागलेच वाढत गेले. तेव्हा बंटी पवार याने आपल्या खिशातून चाकू काढून तो शिवा फुलवानी याच्या हातात दिला. त्यानंतर शिवा फुलवानी याने राजकुमार सुंदरानी यांच्या मांडीवर चाकूने सपासप वार केले. राजकुमारला तेथेच रक्ताच्या थारोळ्यात सोडून दोन्ही आरोपी दुचाकीने घटनास्थळाहून पसार झाले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे राजकुमार सुंदरानी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती काही नागरिकांनी नांदगाव पेठ पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राजकुमार सुंदरानी यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली. खूनाचा हा संपूर्ण घटनाक्रम बारसमोरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. राजकुमार सुंदरानी यांचे मोठे बंधू प्रकाश सुंदरानी यांनी हे फुटेज बघितल्यानंतर नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
-महामार्गावर पहाटेपर्यंत सुरु असतात बार
एसए इंपेरियल बार अँड रेस्टॉरंट हे शिवसेना उबाठा पक्षाच्या एका बड्या नेत्याचे असून हा बार मध्यरात्रीनंतर पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत सुरु असतो. ग्राहकांची वर्दळही असते. या बारला शासनाचे कोणतेही नियम लागू नसल्याचे दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन होत असताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. महामार्गावर रात्रभर बार आणि रेस्टॉरंट सुरू राहत असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा याठिकाणी ठिय्या असतो. त्यातून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आधीच वर्तविली जात होती. अशातच शुक्रवारी रात्री ही खूनाची घटना घडली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button