अचलपूर-मूर्तिजापूर ब्रॉडगेजसाठी डीपीआर मंजूर
अखेर शकुंतलेचे ग्रहण सुटले!

-मध्य रेल्वे विभागाची अधिकृत माहिती
-सात वर्षांचा अहिंसक लढा यशस्वी
-रेल बचाव समितीचा विजय
अचलपूर / 10 सप्टेंबर : अचलपूर-मूर्तिजापूर ब्रॉडगेजसाठी डीपीआरला मध्य रेल्वेची मंजुरी मिळाल्यामुळे सात वर्षांच्या अहिंसक सत्याग्रहाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. सात दशकांहून अधिक इतिहास असलेल्या शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रुपांतराच्या लढ्याला अखेर निर्णायक वळण मिळाले असून अचलपूर-मूर्तिजापूर मार्गासाठी डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) मंजूर झाल्याची अधिकृत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
यामुळे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा सात वर्षांचा अहिंसक लढा यशस्वी ठरला आहे. 2018 पासून अचलपूर येथे सक्रिय असलेल्या समितीने या काळात विविध आंदोलन, रस्तारोको, उपोषणे, जागरण यांसारख्या अहिंसक मार्गांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. 2022 मध्ये फायनल लोकेशन सर्व्हे (एफएलएस) मंजूर झाला, मात्र डीपीआर न झाल्यामुळे ब्रॉडगेजचे काम ठप्प राहिले होते. समितीने सातव्या वर्षी देखील हार न मानता संघर्ष कायम ठेवला आणि अखेर यश मिळवले. समितीचे प्रतिनिधी योगेश खानजोडे, डॉ. राजा धर्माधिकारी, विजय गोंडचवर आणि दयाराम चंदेले यांनी भुसावळ येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पुनीत अग्रवाल व मुख्य अभियंता (निर्माण) संदीप सिन्हा यांची भेट घेतली.
बैठकीत ब्रॉडगेज कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली आणि अधिकार्यांनी स्पष्ट केले की अचलपूर-मूर्तिजापूर डीपीआर मार्गी लागला आहे. समितीने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आणि हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे जाहीर केले. या सात वर्षांच्या आंदोलनात अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचा सक्रिय सहभाग राहिला. यामध्ये माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण संघटना, संस्कार भारती, मानव सेवा समिति, क्रांती ज्योती संघटना, जमाते इस्लामिक हिंद संघटना, मराठा सेवा संघ आणि व्यापारी संघटना यांचा सहभाग विशेष राहिला. समितीतील शेकडो कार्यकर्त्यांनी सात वर्षांच्या संघर्षात सक्रिय सहभाग घेतला.
संघर्ष, सातत्याची चिकाटी आणि शेकडो कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न यांचा परिपाक म्हणून शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. अचलपूर ते मूर्तिजापूर हा टप्पा मार्गी लागल्यामुळे पुढील काळात संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास जाण्याचा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. गावोगावात या निर्णयाचे स्वागत होत असून शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा विजय अचलपूरसह संपूर्ण मेळघाट-विदर्भासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
-अथक प्रयत्न करणारे सत्याग्रही
शकुंतला रेल्वे मार्गाला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी गेल्या सात वर्षात शेकडो कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग दिला. यामध्ये योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, डॉ. राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, दिपा तायडे, शारदा उइके, कमल केजरीवाल, राजकुमार बरडिया, वसंत धोबे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, रामदास मसने, दयाराम चंदेले, विजय गोंडचवर, संतोष नरेडी, राजेंद्र जायसवाल, दिपाली विधले, राजेश पांडे, किरण गवाई, मुरलीधर ठाकरे, शंकर बारखडे, किरण वडूरकर, बेबी वजाले, उज्ज्वला माकोडे आणि डॉ. दीपक गुलहाने यांचा विशेष सहभाग होता.




