जिल्ह्यात अंत्योदय कुटुंबांना मोफत साडी

गरिब महिलांना मिळणार आधार

अमरावती/15 मे ; अमरावतीच्या जिल्हा पुरवठा विभागाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक गरीब कुटुंबांना रेशन दुकानांमधून मोफत साडी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 466 कुटुंबांना जून महिन्यापासून या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना लग्नकार्यासाठी आणि सण-उत्सवासाठी नवीन वस्त्र मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाकडून तयार करण्यात आलेल्या या दर्जेदार साड्यांचे वाटप पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि संगणकीय प्रणालीद्वारे केले जाईल. वर्षातून एकदा एका कुटुंबाला एक साडी याप्रमाणे हा लाभ मिळणार असून, गेल्या वर्षीही जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक महिलांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला होता. रामनवमीच्या मुहूर्तावर हे वाटप होणार होते, पण काही तांत्रिक अडचणींमुळे याला थोडा उशीर झाला. आता जून महिन्यात या साड्या थेट लाभार्थ्यांच्या हातात पडणार असून दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये मोठी लोकसंख्या असल्याने प्रशासनाने तेथे चोख नियोजन केले आहे. सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी सांगितले की, सर्व रेशन दुकानदारांना या संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या असून डिजिटल प्रणालीमुळे वाटपात कोणतीही अडचण येणार नाही. जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे: धारणी 26216, चिखलदरा 20420, मोर्शी 8067, चांदूर बाजार 8533, अमरावती शहर 8373, वरुड 8324, अचलपूर 6723, दर्यापूर 6681, अंजनगाव सुर्जी 6211, अमरावती ग्रामीण 6071, धामणगाव रेल्वे 5486, नांदगाव खंडेश्वर 5275, भातकुली 4649, तिवसा 4398 आणि चांदूर रेल्वे 4340.

संबंधित बातम्या

Back to top button