कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी महिलेची आत्महत्या

विष प्राशन करुन जीवन संपविले

मोर्शी / 16 जुलै : कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या एका शेतकरी महिलेने शेतात पेरणी केल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मोर्शीनजीकच्या जुना अंतोरा येथे मंगळवार, 15 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अर्चना महेंद्र गौरखेडे (40, रा. अंतोरा) असे मृतक महिलेचे नाव आहे.
आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुना अंतोरा गावातील रहिवासी अर्चना महेंद्र गौरखेडे यांच्याकडे शिरखेड शेतशिवारात 2 एकर शेती असून त्यांनी यावर्षी पेरणीसाठी बँक ऑफ इंडिया व बचत गटाचे जवळपास दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. शेतात अर्चना गौरखेडे यांनी सोयाबीन, तूर या पिकाची लागवड केली. मात्र निसर्गाची अवकृपा झाली. पाऊस वेळी-अवेळी पडत असल्यामुळे पेरणी वाया जाण्याची चिंता त्यांना भेडसावत होती. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत त्या होत्या.
गेल्यावर्षी सुद्धा त्यांच्यावर असेच संकट ओढावले होते. शेतात लागवडीचे पैसे सुद्धा निघाले नाही. अर्चना यांचे पती पायाने अपंग असल्याने त्यांना कुणाचा फारसा आधारही नव्हता. एकट्याच्या बळावर कुटुंबाचा डोलारा सांभाळणार्‍या अर्चना गौरखेडे त्यामुळे हतबल झाल्या होत्या. आज नेहमीप्रमाणे त्या आपल्या शेतात गेल्या. तेथे दुपारी चार वाजताचे सुमारास त्यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. संध्याकाळपर्यंत पत्नी घरी वापस न आल्यामुळे तिचे दिव्यांग पती हे आपल्या मित्राला सोबत घेऊन शेतात गेले असता, त्यांना अर्चना यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले.
सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आज बुधवारी शवविच्छेदनानंतर महिलेचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेची तक्रार मोर्शी पोलीस ठाण्यात देण्यात आली असली तरी घटनास्थळ शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे तपास शिरखेड पोलिसांना सोपविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button