महावितरण कार्यालयाच्या परिसरात साफसफाई

मध्यवर्ती बँकेत विज बील स्वीकारणे सुरू

गुरुकुंज मोझरी /3 डिसेंबर  : स्थानिक गेल्या काही महिन्यांपासून विज वितरण कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे विजबिल स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेत विजबिल जमा न करण्याचे आदेश अनाहूतपणे कायम राहिल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत होती. अनेक नागरिकांना बिल भरण्यासाठी दूरवर जावे लागत होते, तर काहींना तासन्तास रांगा लावूनही कामे न होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
या गंभीर प्रश्नाकडे आपली मातृभूमीने वृत्त प्रकाशित होताच संपूर्ण प्रशासन हलले. प्रकाशित वृत्तानंतर विज वितरण विभागातील अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी बँक अधिकार्‍यांशी तातडीने बैठक घेतली. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत बँक व्यवस्थापकांनी विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिली असून आता सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत विद्युत देयकांची स्वीकृती पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे.
ग्राहकांची महिनोंमहिने सुरू असलेली तारांबळ संपुष्टात आली असून या निर्णयाचे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे विलंबित बिलांवर होणारा भारही कमी होणार आहे.
कार्यालय परिसरातील झुडपांचा बोजवारा; स्वच्छतेची मोहीम सुरू-विज बिल स्वीकृती ठप्प असण्याइतकीच चिंताजनक स्थिती कार्यालय परिसरातील अव्यवस्थेमुळे होती. विज वितरण कार्यालयाभोवती वाढलेल्या झाडाझुडपांमुळे प्रवेशद्वार दिसेनासे झाले होते. गर्द झाडीतून मार्ग काढत ग्राहकांना कार्यालयात जाणे-येणे कठीण झाले होते. विशेषतः महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना या परिस्थितीत अधिक त्रास सहन करावा लागत होता. समस्या प्रकर्षाने पुढे आल्यानंतर विभागाने स्वच्छतेची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. झुडपे तोडण्याचे आणि परिसर साफसफाईचे काम गतीने सुरू असून काहीच दिवसांत कार्यालयाचे रूपडे बदलत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. कार्यालयात येणार्‍या नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी त्यांनी यापूर्वीच केली होती.

ग्राहकांना मोठा दिलासा

विज बिल स्वीकृती पुन्हा सुरू होणे आणि कार्यालय परिसर स्वच्छतेच्या प्रक्रियेला वेग येणे, या दोन्ही गोष्टींमुळे गुरुकुंज मोझरीतील नागरिकांमध्ये सुखद समाधान व्यक्त होत आहे. आपली मातृभूमीने समाजहिताचा प्रश्न उचलून धरल्यानंतर प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली गेली आणि समस्या मार्गी लागली, याची जाणीव स्थानिकांच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे दर्शवतात. स्थानिक ग्राहकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी विज वितरण कार्यालयाने पुढेही अशाच तातडीच्या उपाययोजना सुरू ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button