कैलाश मोरे यांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात
खा.बळवंत वानखडे यांची उपस्थिती

अमरावती/8 मार्च – गेल्या चौदा वर्षांपासून अमरावती शहराच्या भूमीत भीमा कोरेगाव येथील शौर्यगाथेला विश्वविक्रमी मानवंदनेद्वारे उजाळा देणारे मुख्य आयोजक कैलास मोरे यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी अमरावतीकरांच्या वतीने एका भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक विश्रामगृह येथे पार पडलेल्या या सोहळ्यात खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते मोरे यांचा सन्मान करण्यात आला असून, या उपक्रमामुळे अमरावतीचे नाव राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने कोरले गेले असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. शिस्तबद्ध नियोजन आणि जनसामान्यांपर्यंत शौर्याचा इतिहास पोहोचवणार्या या उपक्रमाचे हे यश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.अमरावती शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात भर घालणार्या भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमाचे स्वरूप आता जागतिक स्तरावर पोहोचले आहे. या महान कार्याचे सारथी कैलास मोरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय चिकाटीने आणि दूरदृष्टीने हा सोहळा यशस्वी केला आहे. या कार्याची पावती म्हणूनच अमरावतीच्या नागरिक समितीने त्यांचा जाहीर सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमयी बुद्ध वंदनेने करण्यात आली. या प्रसंगी खासदार बळवंतराव वानखडे यांनी मोरे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, या उपक्रमामुळे भीमा कोरेगावचा गौरवशाली इतिहास आज घराघरांत आणि मनामनांत पोहोचला आहे. समाधान वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मोरे यांच्या सामाजिक प्रवासाची आणि कष्टाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. ज्येष्ठ समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात वसंतराव गवई यांनी मोरे यांच्या संघटन कौशल्याचा गौरव केला. या सन्मान सोहळ्याला मंदाकिनी बागडे, सदानंद वानखडे, एस यु फुलझेले, धनंजय गुळदेकर, गौतम भटकर, व्ही एम वानखडे, सुखदेवराव ढोके, दीपक सवाई यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे बी एस राय, सतीश नाईक, गौतम बनसोड अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या भव्य उपक्रमाच्या यशस्वीतेमागे मानवंदना आयोजन समितीचे योगेश घुगे, सुभाष गडलिंग, सुमेध कांबळे, राकेश जंजाळ, बंडूभाऊ चोटपगार, राजकुमार वरघट, दादाराव इंगोले, सिद्धार्थ चोरपगार, बन्सीभाऊ भटकर, परमेश्वर वराठे, पंकज धर्माजी वंजारी, उदयभान गजभिये, कृष्णराव वानखडे, मनीष गुडधे, रुपेश भिवगडे आणि योगेश बिसान्द्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महिला शक्तीचाही यात मोठा सहभाग असून सरला इंगळे, कांचन आडोळे, सुशीला नागदिवे, आशा मेश्राम, अनिता जवंजाळ, कल्पना बनकर, प्रतिभा वानखडे, बेबीताई मोहोड, सारिका मेश्राम, मंदाताई गवई, मायाताई बागडे, कुंदाताई डांगे, अर्चना थोरात, सुनीता शिरसाट, सुवर्णा खांडेकर, लता गजभिये, वैशाली धवणे, रेश्मा सरदार, मोनिका कोकणे, माधुरी इंगळे, माया मेश्राम, बबिता डोंगरदिवे आणि वंदना चव्हाण यांच्यासह गजानन गेडाम,अक्षय सरोदे, मंगेश दांडेकर, प्रकाश ढोणे व प्रशांत तायडे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.




