धारणीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा

नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला वेग

* रंगभवन मैदानावर जाहिर सभा

धारणी /24 नोव्हेंबर : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारणी शहरात राजकीय वातावरण तापले असून प्रचाराची धग दिवसेंदिवस वाढत आहे. या उत्सुकतेत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने प्रचाराला मोठे बळ मिळणार आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चौथमल आणि इतर पंधरा नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
धारणी शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. फडणवीस यांच्या भेटीची बातमी समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून सभा यशस्वी करण्यासाठी विविध विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा जवळ येत असल्याने घराघरात संपर्क, मतदारांशी संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यास उमेदवारांनी वेग वाढविला आहे.
सभेचे ठिकाण म्हणून रंगभवन मैदान निश्चित करण्यात आले असून व्यासपीठ, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना आणि बंदोबस्त यांची मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. अपेक्षित गर्दीचा विचार करून पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडून मैदान परिसराचे निरीक्षण करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.निवडणूक प्रचारात सुनील चौथमल यांच्यासह सर्व उमेदवार स्थानिक मुद्द्यांवर मतदारांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधत आहेत. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, बाजारपेठ व्यवस्था तसेच रोजगाराच्या संधी यांसारखे प्रश्न लोकांसमोर मांडले जात असून गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या विकासात गती येण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचा मुद्दा ठळकपणे अधोरेखित केला जात आहे. गोरगरीब, कामगार, व्यावसायिक, शेतकरी आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांच्या अडचणी जाणून घेत निवडून आल्यास त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले जात आहे.
धारणीतील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे, पक्षाच्या योजनांची माहिती देणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा निर्माण करणे या सर्व उद्दिष्टांसाठी आजची सभा निर्णायक ठरेल, असा भाजप पदाधिकार्‍यांचा विश्वास आहे. व्यापारी वर्ग, विविध संघटना, तरुण आणि महिला यांच्याकडून सभेला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा धारणीतील राजकीय वातावरणात ढवळून निघेल. याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यातील ही सभा धारणीच्या आगामी राजकारणाला दिशा देणारी ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button