छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन
अमरावती येथे डी एम एक्स रक्तदाता संघच्यावतीने

अमरावती/11 मे: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369 व्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी, 14 मे रोजी अर्जुन नगर चौकात शिवशंभूंचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. ’डी एम एक्स ग्रुप’ रक्तदाता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात पराक्रमाचा इतिहास पुन्हा जिवंत होणार असून, भगव्या ध्वजाच्या सावलीत संपूर्ण शहर न्हाऊन निघणार आहे. या दिमाखदार सोहळ्याचे मुख्य आकर्षण ’वक्रतुंड ढोल ताशा आणि ध्वज पथक’ असणार असून, त्यांच्या निनादाने अमरावतीची नगरी दुमदुमून जाईल. सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते भव्य महाआरती संपन्न होणार आहे. या मंगलप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या महापौर श्रीचंदजी तेजवानी, आमदार सुलभाताई खोडके, आमदार प्रवीणजी तायडे आणि आमदार राजेशजी वानखडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच माजी महापौर चेतनजी गावंडे, माजी नगरसेवक तुषारजी भारतीय, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस प्रशांतजी शेगोकार आणि प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू शंभूराजांना मानाचा मुजरा अर्पण करतील.




