चित्तथरारक ! पाण्यावर जळती मशाल, तरंगणारा मल्लखांब
हव्याप्र मंडळाच्या उन्हाळी शिबीर

-समारोप नेत्रदीपक व साहसी कवायतींनी
-जलतरण विभागाचे सादरीकरण
अमरावती / 3 जून: श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आंतरराष्ट्रीय जलतरण विभागाचा लैकीक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्याची अनुभूती जलतरणपटूंच्या चित्तथरारक प्रात्यक्षिक सादरीकरणातून आली. सिंक्रोनाइज स्विमींग, वाटर पोलो, स्विमींग ड्रिल सोबत अंधारामध्ये पाण्यावर जळती मशाल, फाउंटन्ट (कारंजा) आणि पाण्यावर तरंगणारा मल्लखांबची प्रात्याक्षिके नेत्रदीपक आणि रोमहर्षक ठरली. औचित्य होते, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी शिबीराच्या समारोप सोहळ्याचे. सोमवार 2 जुन रोजी सायं. 6 वाजता मंडळाच्या जलतरण विभागात साहसी जलतरण प्रात्यक्षिक पार पडले. विशेष म्हणजे, मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून खेळाडूंचा सत्कार व कौतुक केले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका राधा कुरील, टॉमी जोश, प्रा. प्रणव चेंडके, प्रा. दीपा कान्हेगावकर, पडोळे मॅडम, डॉ. संजय तिरथकर, जलतरण विभागप्रमुख डॉ. योगेश निर्मल, शिबीर संचालक राजेश महात्मे, महेंद्र लोणकर, डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंडळाचे छत्रपती पुरस्कार प्राप्त सांजली वानखडे, पार्थ अंबुलकर, यश दुर्गुे, वेदांत सराफ, कौस्तुभ गाडगे, स्वर्णीम शेटे, मंथन शिवनीकर, पियुशनी देशमुख, भूमिका गिरी, अंजली राऊत, नारायणी यांच्यासह विविध पुरस्कार मिळालेल्या 17 जलतरणपटूंचा सत्कार करण्यात आला.
जलतरण विभागाचे प्रमुख डॉ. योगेश निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सोहळ्यामध्ये जलतरणपटूूंनी विविध कवायती सादर करीत उपस्थित नागरीकांची मने जिंकली. सोहळ्याचे संचलन व आभार प्रदर्शन प्रा. आशिष हटेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मयुर कुमार, प्रा. मनोज कोहळे, गोहाड सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
-सुदैवाने बचावला युवक
जलतरण कवायती सुरू असताना युवकाचा अचानक तोल जावून तो पाण्यात पडला. वाचवा…वाचवा अशी मदतीची हाक त्याने दिली. तेव्हा अनेक जलतरणपटूंनी पाण्यात उडी घेत त्याला बाहेर काढले व त्याचा जीव वाचवला. यावेळी त्याला तत्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली. एकूणच या प्रकारामुळे काही वेळ खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर हा सर्व प्रकार सादरीकरणाचा भाग असल्याचे सांगत डॉ. योगेश निर्मळ यांनी स्विमींगचे महत्व उपस्थितांना पटवून दिले.
-लक्षवेधी पाण्यावर तरंगणारा मल्लखांब
जलतरण प्रात्यक्षिक व कवायतींमध्ये पाण्यावर तरंगणारा मल्लखांब लक्षवेधी ठरला. मल्लखांब विभाग प्रमुख प्रा. मयूर दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मुली व 10 मुलांच्या चमूने तलवार, जळती मशालसह विविध मल्लखांब कवायतीच्या सादरीकरणातून उपस्थितांची वाहवा मिळविली. साधारणपणे 2005 मध्ये मल्लखांब विभाग प्रामुख डॉ. विलास दलाल व जलतरण विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे यांनी पाण्यावर तरंगणार्या मल्लखांबचा प्रयोग यशस्वीरीत्या साकार केला. त्यानंतर पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी दिलेल्या पाठबळामुळे 2010 व 2011 मध्ये इंडिया गॉट टॅलेंट व इंटरटेन्टमेंट के लिये कुछ भी करेगा… या सोनी व कलर्स टीव्हीशो मध्ये पाण्यावरचा मल्ल्लखांब व विविध कवायती सादर करीत 1 लक्ष 11 हजार रुपये पारितोषिक पटकावले होते. तेव्हा पासून दरवर्षी जलतरण विभागाच्या सोहळ्यामध्ये पाण्यावर तरंगणारा मल्लखांब कवायती आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. विशेष म्हणजे, या कावयाती सादर करणे एक मोठे आव्हान असते. जमिनीपेक्षा 16 ते 20 फूट खोल पाण्यावर अस्थिर असलेला मल्लखांब कवायती सादर करतांना प्रशिक्षित खेळाडूंच्या कवायती नेत्रदीपक ठरल्या.